नोकरीइच्छुक तरुणांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे मंत्री कौशल्यविकास नवाब मलिक यांचे आवाहन
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राज्यात १२ आणि १३ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास उमेदवार व उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मेळाव्याचा कार्यक्रम आता २० डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला असल्याची माहिती कौशल्यविकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली. राज्यातील बेरोजगार तरुण व उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.मलिक यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्यात सहभागासाठी नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. यापूर्वीच नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, जेणेकरुन त्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ याद्वारे सहज उपलब्ध होऊ शकेल. असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.
नोकरीइच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून यामध्ये राज्यातील सर्वसाधारणपणे 9 वी पास पासून पुढ़े 10 वी, 12 वी. आयटीआय, डिप्लोमा तसेच बीई व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार सहभागी होऊ शकतात. विविध नामांकित उद्योग, व्यवसाय यांनाही त्यांच्याकडील रिक्तपदांसह मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
मेळाव्यात राज्यभरातील नामांकित उद्योगांचा सहभाग
मेळाव्यात दररोज विविध क्षेत्रातील उद्योजक सहभागी होत आहेत. आतापर्यंत नामांकित उद्योजकांनी सहभाग नोंदविला आहे. प्रिमियर सील्स, मरेली मदरसन ऑटो, व्होडाफोन इंडिया सर्व्हिसेस, महिंद्रा स्टील सर्व्हीस सेंटर, एल जी इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., हायर अॅप्लायन्सेस, महिंद्रा सीआयई ऑटोमोटीव्ह लि., मिंडा कॉर्पोरेशन लि., रुप पॉलिमर्स, बीएनवाय मेलन (बीपीओ), मास्टरकार्ड मोबाईल ट्रान्झॅक्शन सोल्युशन प्रा. लि., अॅडविक हाय-टेक, युकेबी इलेक्ट्रॉनिक्स, राधेय मशिनिंग, युरेका फोर्ब्स, फोर्स मोटार्स, वायका इन्स्ट्रूमेन्टस, विल्यम्स कंट्रोल्स, जयहिंद सियाकी. कायनेटिक कम्युनिकेशन्स, एमक्युआर फार्मास्युटिकल्स इ. सारख्या पुणे जिल्ह्यातील नामांकित कंपन्या तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील नामांकित खाजगी कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारची रिक्तपदे नोंदविली आहेत.
असा करावा ऑनलाईन अर्ज…
हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. होमपेजवरील नोकरीसाधक (Job Seekar) लॉगीनमधून आपापल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करुन प्रथम आपणास जिथे अर्ज करावयाचा आहे तो जिल्हा निवडून त्यातील STATE LEVEL MEGA JOB FAIR या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर View Vacancy List पाहून उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी, आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन आपली पात्रता असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल. शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. व्हॉटस्ॲप, स्काईप, झूम इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतात. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री श्री. नवाब मलिक यांनी सांगितले.