Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

ऐन दिवाळीतच कांदा दर पुन्हा घसरला

नाशिक :  लासलगाव  बाजार समितीमध्ये ऐन  सणासुदीच्या तोंडावर कांद्याचा दर मोठ्या प्रमाणात घसरला . अवघ्या दोन दिवसांत तब्बल १३५१ रुपयांनी दर घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला  आहे. सोमवारी सरासरी ४६५१ रुपये प्रति क्विंटलने विक्री झालेला कांदाआज अचानक  सरासरी ३३०० रुपये प्रति क्विंटलने विक्री झाला. शेतकऱ्यांना दोन दिवसात तब्बल १३५१ रुपये प्रति क्विंटलचा फटका बसला आहे.
गुरुवार १२ नोव्हेंबरपासून लासलगाव बाजार समितीला दिपावलीनिमित्त आठ दिवस सुट्या असल्याने बाजार समितीत कांदा आवक वाढलेली आहे. तब्बल दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच मुख्य बाजार आवारावर मंगळवारी बारा हजार क्विंटलच्या पुढे कांदा लिलावासाठी आला होता.
परदेशी आयात केलेला कांदा, उन्हाळ कांदा तसेच नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे.
यामुळे लासलगाव बाजार समितीत दोन दिवसात १३५१ रुपयाने कांदा गडगडल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने  झालेला खर्च कसा काढावा असा प्रश्न आता कांदा उत्पादकांसमोर उभा राहिला आहे वेगवेगळ्या निर्बंधांमुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने शेतकरी चिंतग्रस्त झाला आहे
सकाळच्या सत्रात येथील बाजार  समितीत      ४९० वाहनातून ७५०० क्विंटल कांद्याची आवक झाली होती त्याला कमाल ४४७१ रुपये ,सर्वसाधारण ३३०० रुपये तर किमान १२०० रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव जाहित झाला तर लाल कांद्याला किमान १०००,सरासरी २२०० तर जास्तीत जास्त ३९०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
दिवाळीत लिलाव बंद 
मालेगाव तालुक्यात कांद्याची प्रसिद्ध बाजारपेठ असलेली उमराणे येथील कृषि उत्पन्न बाजार समिती आवारात दीपावली निमित्ताने
 गुरूवार दि.१२ नोव्हेंबर  ते दि 22 पर्यंत  कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. याशिवाय  गुरूवार दि.१२ नोव्हेंबर ते बुधवार दि १८ नोव्हेंबरपर्यंत  मका लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती बाजार समिती सचिवांनी दिली आहे.
Exit mobile version