नाशिक , २६ : यंदा बदललेल्या हवामानाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून लागवड क्षेत्र वाढूनही लाल कांद्याचे रोग आणि पाऊस यामुळे लाल कांद्याचे उत्पादन ७० टक्के घटले. त्यातही हाती आलेले पिक बाजारपेठेत आणल्यावर निर्यात बंदी लादून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी केली. त्यात कांदा बाजार सावरत असतानाच आता व्यापार्यांनी लिलाव बंद ठेवल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने लासलगाव परिसरातील कांदा व्यापार्यांवर छापे टाकल्याने संतप्त व्यापार्यांनी त्याचा राग शेतकऱ्यांवर काढला आणि लिलाव बंद केले. ही स्थिती सुधारत असतानाच कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अलीकडेच केंद्राने २५ टन पेक्षा जास्त कांदा साठवण करता येणार नाही असे निर्देश दिल्याच्या निषेधात पुन्हा एकदा कांदा व्यापार्यांनी लिलाव बंद ठेवत शेतकऱ्यांना वेठीला धरले. कांदा साठवणुकीवर घाऊक व्यापाऱ्यांना मर्यादा घातल्याने नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा व्यापरी लिलावात सहभागी न झाल्याने कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहे.
बाजारसमितीची भूमिका संशयास्पद
लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावसाठी आल्यास कांद्याचे लिलाव केले जाणार असल्याचे लासलगाव बाजार समितीच्या सभापतींनी जाहीर केले आहे. मात्र दुसरीकडे विक्री साठी आलेला कांदा परत पाठविला जात असल्याचे शेतकरी सांगत आहे. परिणामी बाजार समिती व व्यापारी यांच्या दुहेरी भूमिकेमुळे कांदा उत्पादक शेतकरी संभ्रम अवस्थेत आहेत.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात उच्चांकी विक्रम झाल्याने केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर मर्यादा घालत घाऊक व्यापाऱ्याकडे 25 टनापर्यंत तर किरकोळ व्यापाऱ्याकडे 2 टनापर्यंत कांदा साठवणूक करण्याची मर्यादा घातल्याने व्यापारी कांदा लिलावात सहभागी होणार नसल्याचे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आज बाजार समित्यांमध्ये कांदा आणलाच नाही त्यामुळे बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसत आहे लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू राहणार असून त्यासाठी व्यवस्था केलेली असल्याचे बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले
सणासुदीच्या काळात बाजार समित्यांमध्ये अचानक कांदा लिलाव बंद पडले आहे दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे आज चांदवड तालुक्यातील तळेगाव येथून नवीन कांदा लासलगाव येथे विक्रीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आणला होता मात्र बाजार समिती च्या गेटवरच आज लिलाव बंद असल्याचे सांगून परत काढून दिल्याचे शेतकरी सांगत आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव तात्काळ सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे,शैलेंद्र पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने कांदा व्यापाऱ्यांना कांद्याचा साठा मर्यादा 25 टनापर्यंत ठेवण्याची अट घातली आहे . याविरोधात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.कांदा व्यापार्यांनी ऐन सणासुदीच्या व रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कांदा खरेदी बंद केल्यामुळे शेतकर्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहणार आहेत. कांदा उत्पादकांना आर्थिक तरतुदीची आता गरज असल्याने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे कामकाज मंगळवार (दि.२७)पासून सुरू करावे, याबाबतचे आदेश आपल्या स्तरावरून निर्गमित करावेत. तसेच बाजार समित्यांनाही आजच तशा सूचना देण्यात यावयात.याबाबतचे आदेश सहकार विभागाने द्यावे, अशी मागणीही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे शैलेंद्र पाटील यांनी केली आहे.