Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात उभारणार दीड लाख परवडणारी आरोग्य केंद्रे

25 कोटीहून अधिक लोकांना परवडणारी प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध

सार्वत्रिक आरोग्यसेवेच्या प्रवासात भारताने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. 50,000 हून अधिक (50,025) आयुष्मान भारत- आरोग्य आणि कल्याण केंद्रे (एबी-एचडब्ल्यूसी) आता देशभरात कार्यरत आहेत. लोकांना  त्यांच्या घराशेजारीच सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (सीपीएचसी) प्रदान करण्याच्या उद्देशाने डिसेंबर 2022 पर्यंत 1.5 लाख एबी-एचडब्ल्यूसी स्थापित केले जाणार आहेत. आतापर्यंत 50,000 हून अधिक केंद्रे स्थापन झाल्यामुळे, 1/3 उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. यामुळे 25 कोटीहून अधिक लोकांना परवडणारी प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे.

कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्‌भवलेल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये देखील राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी एचडब्ल्यूसी कार्यान्वित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी त्यांचे अभिनंदन केले. “सर्व स्तरांवर नियोजन, देखरेख, प्रक्रियेचे मानकीकरण यामध्ये  केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे, राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना प्रदान करण्यात आलेली लवचिकता आणि आतापर्यंत उभारण्यात आलेली आरोग्य यंत्रणा यामुळे हे शक्य झाले आहे,” असे त्यांनी नमूद केले. व्यापक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्याचा हेतू आणि या कठीण परिस्थितीत लाखो लोकांना आवश्यक सेवा दिल्याबद्दल एचएफएमने आघाडीचे आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि आशा यांचे विशेष आभार मानले. “आरोग्य सेवा पुरवणाऱ्या यंत्रणेचा ते कणा आहेत. कोविड कालावधीत त्यांचे योगदान अनुकरणीय आहे ”, असे ते म्हणाले. एचडब्ल्यूसीने जोखीम संप्रेषण, संपर्क ट्रेसिंग, समुदायाचे निरीक्षण करणे  आणि रुग्णांची  लवकर ओळख पटवणे या सारख्या बाबींमध्ये  मदत केली आणि नवजात बालके, वृद्ध आणि इतर आजार असणाऱ्या असुरक्षित गटांच्या संरक्षणासाठी, विना-कोविड अत्यावश्यक आरोग्य सेवांची अखंड सेवा प्रदान करण्यात सहाय्य केले.

आसाममधील एचडब्ल्यूसीमध्ये कोविड-19 ची तपासणी

आरोग्य आणि कल्याण केंद्रे (एचडब्ल्यूसी) आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना (पीएमजेएवाय) या दोन स्तंभांसह 2018 मध्ये आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2018 रोजी छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील झांगला येथे पहिल्या एबी-एचडब्ल्यूसीचे उद्‌घाटन केले.

आरोग्य आणि कल्याण केंद्रे लोकांना सीपीएचसी सेवा प्रदान करतात आणि पुनरुत्पादक, माता, नवजात, मूल, पौगंडावस्थेतील पोषण (आरएमएनसीएचए + एन) सेवा आणि संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण यासाठी प्रयत्न करतात. ते रोग प्रतिबंध विशेषतः जुने आणि असंसर्गजन्य आजारांवर आणि समुदाय सहभागातून कल्याण यावर लक्ष केंद्रित करतात.

ओडिशाच्या फुबसाही खुर्धा एचडब्ल्यूसी येथे योग सत्र

आरोग्य मंत्रालयाच्या ई संजीवनी प्लॅटफॉर्मच्या अंमलबजावणीसाठी देखील एचडब्ल्यूसी सहाय्य प्रदान करते, यामध्ये ई-संजीवनी रुग्ण-ते-डॉक्टर ओपीडी आणि ई-संजीवनी-एचडब्ल्यूसी समाविष्ट आहे जे डॉक्टर-ते-डॉक्टर टेलिकन्सलटेशन  सेवा प्रदान करते. 23,103 एचडब्ल्यूसीने नागरिकांना टेलिकन्सलटेशन सेवा प्रदान करण्यास सुरवात केली आहे. या मंचाद्वारे 7.5 लाखांहून अधिक टेलिकन्सलटेशन सेवा यापूर्वीच प्रदान करण्यात आल्या आहेत. ई संजीवनी-एचडब्ल्यूसी नोव्हेंबर 2019 पासून सुरु करण्यात आली आहे. डिसेंबर 2022 पर्यंत हे ‘हब  अँड स्पोक’ मॉडेलनुसार सर्व 1.5 लाख आरोग्य आणि कल्याण केंद्रांमध्ये राबविण्यात येणार आहे. आरोग्य आणि निरोगीकरण केंद्रे (एचडब्ल्यूसी) यांना दूरध्वनी-सल्ला सेवा देण्यासाठी राज्यांना वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयात समर्पित ‘हब’ स्थापित करण्याची आवश्यकता आहे.

Exit mobile version