डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा ताप राहतो कमी वेळ

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे आलेला ताप हा डेल्टा या प्रकाराच्या तापापेक्षा कमी वेळ राहत असल्याचे शहरातील गेल्या तीन आठवड्यांमधील कोरोना रुग्णांच्या तपासणीच्या आधारे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सच्या सदस्यांनी हे निरीक्षण नोंदविले आहे.

तसेच छातीचा सीटीस्कॅन अहवालातही आतापर्यंत बहुतेक रुग्णांमध्ये सामान्य निष्कर्ष असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, “ओमायक्रॉन प्रकारामुळे होणारा तापाचा कालावधी हा पूर्वीपेक्षा अतिशय कमी असून तो अनेक रुग्णांमध्ये ७१ तासांपेक्षाही कमी आहे. डेल्टामुळे मात्र, तापाची तीव्रता जास्त होती तसेच त्याचा कालावधीही जास्त होता.”

गेल्या तीन आठवड्यांतील रुग्णांमधील लक्षणांचा अभ्यास केला असता ओमायक्रॉनमुळे घशात तीव्र जळजळ, ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखी, कफ, चोंदलेले नाक, कणकण, थकवा ही लक्षणे दिसत असून ती दोन ते पाच दिवस राहतात, असे जोशी यांनी सांगितले.
तर टास्क फोर्सचे सदस्य डॉ. वसंत नागवेकर म्हणाले, “ताप कमी प्रमाणात असल्यास शक्यतो सीटीस्कॅनची शिफारस केल्या जाता नाही. मात्र, ज्या रुग्णांनी ही चाचणी करण्याचा आग्रह धरला त्यांच्या अहवालानुसार सुमारे ९० ते ९५ टक्के जणांचे अहवाल हे सामान्य होते. डेल्यामध्ये मात्र, सीटीस्कॅनचे अहवालामध्ये मध्यम ते तीव्र संसर्गा झाल्याचे लक्षणे आढळत होती.” आमच्या रुग्णालयातील कोणताही ओमायक्रॉनचा रुग्ण सध्या ऑक्सिजीनवर नसल्याचे डॉ. नागवेकर यांनी सांगितले.

रुबी हॉल क्लिनिकचे तज्ज्ञ आणि टास्क फोर्सचे सदस्य डॉ. कपिल झिरपे म्हणाले, “गेल्या दोन आठवड्यांतील रुग्णांमध्ये बहुतेक रुग्ण हे लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणांची आहेत. त्यांच्यात सौम्य ताप दिसत असून तो केवळ २४ ते ४८ तासांमध्ये बरा होत आहे. बहुतेक रुग्णांना गरज भासल्यास केवळ पॅरासिटॅमॉलचा उपचार दिला जात आहे. डेल्टामुळे मात्र, तीन ते चार दिवसांध्ये रुग्णांची तब्येत ढासळत होती. त्यात तापात वाढ तसेच श्वास घेण्यात मोठ्या प्रमाणात अडचण येत होती.” आता मात्र, ताप अतिशय कमी असून तो ९९ ते १०० फॅ. असतो आणि तो दोन ते तीन दिवसांमध्ये कमी होतो, असेही ते म्हणाले.