मुंबई, दि. 23 : कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात ‘ब्रेक दि चेन’बाबत सुधारित निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे जनतेने तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करतानाच पोलिस यंत्रणांनी दक्ष आणि सतर्क राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
श्री.वळसे पाटील यांनी सांगितले की, राज्यात मार्च २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. पण या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. राज्यामध्ये जे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत त्यासाठी पोलिस यंत्रणेने योग्य ती खबरदारी घ्यावी. कडक निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करताना कोरोनाची संसर्ग साखळी तोडणे हा आपला मुख्य उद्देश आहे, हे लक्षात ठेवावे आणि त्याप्रमाणे नियोजन करावे. कारवाई करताना जनहितास बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या ठिकाणी नियम मोडले जाणार नाहीत किंवा गर्दी होणार नाही, यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणेने योग्य ते नियोजन करावे. गर्दीची ठिकाणे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार ठरत असल्याचे लक्षात आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे पोलिस प्रशासनाने पाहावे, असेही ते म्हणाले.
कोरोना चाचणी केंद्र, रुग्णालये तसेच लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी घ्यावी. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय, राज्य महामार्ग येत असतील अशा पोलिस ठाण्यांनी अधिकचा पोलिस बंदोबस्त ठेवावा.
खासगी प्रवास वाहतूक, आंतर शहर व आंतर जिल्हा प्रवास, सार्वजनिक प्रवासी वाहतूक याबाबत शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कोरोना प्रतिबंधाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार आपण रोखू शकतो. सर्व नागरिकांनी या त्रिसूत्रीचे पालन करावे आणि शासनास सहकार्य करावे, असे आवाहनही गृहमंत्री श्री.वळसे पाटील यांनी केले आहे.