आता कालव्याऐवजी शेतीला पाईपलाईनने पाणीपुरवठा

दहिकुटे, बोरी अंबेदरी प्रकल्पांच्या कालव्याचे रुपांतर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत

नाशिक जिल्ह्यातील दहिकुटे आणि बोरी अंबेदरी (ता.मालेगाव) या दोन पूर्ण झालेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या अस्तित्वातील कालव्यांचे रुपांतर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. खडकाळ जमिनीत पाणी गळतीच्या समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने पथदर्शी प्रकल्प म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

या प्रकल्पांचे सिंचन क्षेत्र अनुक्रमे 648 हे. व 910 हे. इतके आहे. या प्रकल्पांच्या सध्याचा कालवा व त्यावरील वितरीका या खडकाळ व मुरमाड जमिनीतून जातात. त्यामुळे होणाऱ्या पाणी गळतीने गेल्या दहा वर्षात या प्रकल्पातून अनुक्रमे जास्तीत जास्त 340 हे. व 249 हे. इतकेच सिंचन होऊ शकले आहे.

या प्रकल्पांच्या संपूर्ण सिंचन क्षेत्रास पाणीपुरवठा करण्याकरिता अस्तित्वातील खुले कालवे बंद नलीकांमध्ये रुपांतरित केल्यास फायदा होणार आहे. त्या दृष्टीने अस्तित्वातील उघडे  कालवे  बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दहिकुटे प्रकल्पाकरिता 7.36 कोटी रुपये व बोरी अंबेदरी लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी 17.88 कोटी अशा एकूण 25.24 कोटी रुपयांच्या किंमतीस प्रशासकीय मान्यता यावेळी देण्यात आली.