औरंगाबाद : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा पोळा सण यंदा वेशीवर भरवता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोळा सण रद्द करण्यात आला आहे. पोळ्याच्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्यांनी ‘सोशल डिस्टंसिंग’च्या नियमांचे पालन करत आपली बैलजोडी मारुतीच्या देवळात पूजा करून घरी घेऊन जाण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहे. या दिवशी एका ठिकाणी जमाव होईल, असे कृत्य करू नये. तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे पोलीस प्रशासनाने म्हंटले आहे.
पोळा सणाला शेतकर्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस ‘झडत्या’ (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, ‘मानवाईक’ (गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते.
त्यानंतर पोळा ‘फुटतो’. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्यास ‘बोजारा’ (पैसे) देण्यात येतात, आशा मोठ्या जल्लोषात शेतकरी बैल पोळा साजरा करतात. परंतु, यंदा पोळा सण कोरोनामुळे जल्लोषात साजरा करता येणार नाही. पोळ्याला वेशीवर बैल एकत्र जमवता येणार नाही. वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र येता येणार नाही.
पोळ्याच्या दिवशी ‘सोशल डिस्टंसिंग’च्या नियमांचे पालन करत, प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी मारुतीच्या देवळात पूजा करून घरी घेऊन जाण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.गावातील सरपंच आणि पोलीस पाटील यांनी यावर नियंत्रण ठेवावे. या सर्व नियमांची आता पासून गावात दवंडी पिटवून शेतकऱ्यांना सूचना कराव्या, असे आदेश पोलीस प्रशासनाने सरपंच व पोलीस पाटील यांना दिले आहे.