नाशिक, दि. १३ : राज्यात दिनांक १३ ते दिनांक १७ हा कालावधी बऱ्याच ठिकाणी पावसाचा (rain in maharashtra) असणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दिनांक १३ आणि दिनांक १४ रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उत्तर कोकणात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात या दोन्ही दिवशी येलो अलर्ट देण्यात आला असून येथील तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान मागील २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणची धरणे भरली आहेत तर काही भरण्याच्या मार्गावर आहेत. नाशिक जिल्यातील गणपूर धरण भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. तर जायकवाडीत सुमारे ५८ टक्के पाणी साठा झाल्याने मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरणातून विसर्ग सुरु असून काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील महत्वाची धरणे भरली असून पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळाला आहे.