राज्यात होत असलेल्या नवीन वीज उपकेंद्रांच्या माध्यमातून वीजेची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. बीड हा शेतकऱ्यांचा जिल्हा असून कृषी उपयोगासाठी वीजेची मागणी वाढत आहे यामुळे आज उद्घाटन झालेल्या 33/11 केव्ही सबस्टेशनच्या माध्यमातून जिल्ह्याची वीजेची अडचण दूर होण्यास मदत होईल असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले.
उर्जामंत्री श्री. राऊत यांच्या हस्ते नेकनूर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी महावितरणच्या वतीने उच्च दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या 33/11 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास आमदार संजय दौंड, राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे ,रविंद्र दळवी, नारायण शिंदे, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक भुजंग खंदारे आदी उपस्थित होते. या प्रसंगी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी मंत्री महोदय यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच नेकनूर ग्रामस्थांच्यावतीने नारायण शिंदे यांनी स्वागत केले.
८६ हजार केएल क्षमतेच्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती
प्रकल्पाची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून पाहणी
रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांसाठी दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या अंबाजोगाई येथील ८६ हजार केएल क्षमतेच्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पाहणी केली.
बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उर्जामंत्री श्री राऊत यांनी रात्री उशिरा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत आमदार संजय दौंड, राजकिशोर मोदी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वाल्मिक कराड , वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
ऊर्जामंत्री श्री राऊत यांनी सामाजिक बांधिलकीतून ऊर्जा विभागाच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राने उभारलेल्या या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले.
कोरोना संसर्गाच्या साथीमध्ये बाधित रुग्णांना वैद्यकीय सुविधा देणे हे प्राधान्य आहे सध्या तिसऱ्या लाटेचा धोका असून यामध्ये लहान मुलं, स्तनदा माता, गर्भवती महिला यांच्या उपचारांसाठी प्राधान्य आहे. असे ते म्हणाले.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्येत मोठी वाढ झाल्याने ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली व गरज वाढली. यावेळीऔष्णिक वीज निर्मिती केंद्र परळी वैजनाथ मार्फत ८६ ह.के.एल. क्षमतेचा हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारला २७ एप्रिल २०२१ पासून हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने रुग्णांच्या उपचारांमध्ये त्यांची उपलब्धता झाली.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची परळी औष्णिक वीज केंद्र येथे भेट
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवसभरातील औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या कार्यक्रमांना उपस्थित होते यांच्या हस्ते उद्घाटन, प्रकल्पांची पाहणी असे विविध कार्यक्रम करून मध्यरात्री उशिरा त्यांचे परळी येथे आगमन झाले. तरीही मोठ्या उत्साहात परळीच्या राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार संजय दौंड, वाल्मिक कराड , बाजीराव धर्माधिकारी, लक्ष्मणराव पौळ, अनंत इंगळे यांसह महावितरण आणि औष्णिक वीज केंद्राचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. मध्यरात्री या सगळ्यांचा उत्साह आणि त्यांनी केलेले स्वागत याचा मंत्री महोदय श्री राऊत यांनी स्वीकार केला. दिवसभरातील हजार किलोमीटरचा प्रवास आणि उशीर झालेला असून देखील महावितरण आणि औष्णिक वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नंतरच आपला दौरा थांबवला.