नीती आयोगाने उदया, म्हणजेच 30 डिसेंबरला बांबू विकास या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील एक कार्यशाळा आयोजित केली आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री ( स्वतंत्र कार्यभार) डॉ जितेंद्र सिंह, नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार, नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही. के.सारस्वत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होईल.
भारतातील आणि परदेशातील बांबू व्यवसायाशी संबंधित अनेक लोक या कार्यशाळेला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.बांबू उद्योगातील संधी आणि आव्हाने यावर कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाईल. बांबू क्षेत्रातील संपूर्ण मूल्यसाखळीतील काही राहिलेले दुवे शोधून, ते जोडण्यासाठी नवी धोरणे आणि आराखडा निश्चित केला जाईल.
या कार्यशाळेत चार तांत्रिक सत्रे असतील. पहिले, ‘उत्पादन, मूल्य वर्धन आणि बांबूविषयी आंतरराष्ट्रीय अनुभव’ दुसरे सत्र, ‘सरकारी धोरणे, कार्यक्रम आणि विविध क्षेत्रातील संधी, तिसरे, ‘बांबू क्षेत्रातील चक्राकार अर्थव्यवस्था’ आणि चौथे, अंतिम सत्र ‘राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील, या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती’ असे असेल.
बांबूचा वापर आणि व्यावसायिकीकरण वाढवण्यासाठी, नीती आयोग काही आधुनिक, व्यावहारिक धोरणे/तंत्रज्ञान अमलात आणण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहे, ज्यातून भारतीय बांबू व्यवसायाचा सर्वसमावेशक विकास शक्य होईल.
त्या अनुषंगाने ,’बांबू विकास मिशन दस्तऐवज’ अशा नावाचा एक तंत्रज्ञान-व्यावसायिक अहवाल तयार केला जात आहे. या अहवालात, बांबू व्यवसायाची भारतातील संपूर्ण मूल्य साखळी- मग त्यात बांबू लागवड, उत्पादन, प्रमाणित निकषांनुसार प्रक्रिया आणि उपयोग या सगळ्यांचे विश्लेषण असेल.
बांबू क्षेत्रात असलेल्या क्षमता आणि संधी यांचं शोध घेऊन त्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेत अधिकाधिक रोजगार निर्मितीचा नीती आयोगाचा प्रयत्न आहे. ज्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, मूल्यवर्धनात सुधारणा आणि निर्यातीला चालना देण्यासाठी, बांबू उत्पादनांमध्ये वैविध्य आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.