Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

डिजिटल ७/१२; नाशिक जिल्हा आघाडीवर

नाशिक जिल्ह्यातील १ हजार ९७८ महसूल गावांपैकी १ हजार ९७५ गावांचे सातबारा ऑनलाईन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावांसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाईन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील. जिल्ह्यामध्ये सातबाराचे डिजिटायझेशन आणि संगणकीकरण ही बाब कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या महसूल बाबींच्या आढावा बैठकीत महसूल मंत्री श्री. थोरात बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, वासंती माळी, तहसीलदार राजेंद्र नजन, अनिल दौंड, रचना पवार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री. थोरात म्हणाले, प्रलंबित ई फेरफार प्रकरणांबाबत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही म्हणून योग्य ती उपाययोजना राबविण्यात यावी. तसेच सेवा हमी कायद्याद्वारे ई-हक्क प्रणालीवरील कामांचा यशस्वी पाठपुरावा ही देखील चांगली बाब असल्याचे मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले.

वाढणारी थंडी आणि दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे येत्या पाच सहा दिवसात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे; जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षण मोहिमेमध्ये जवळपास अडीच लाख को-मोर्बिड जिल्ह्यात सापडले असून त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात यावे, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळेल, असेही महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्याचा महसूल विषयक बाबींची सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये सातबारा संगणकीकरण, जिल्ह्यातील 101 सेवांचा समावेश असलेल्या सेवा हमी कायद्याची कार्यवाही, कॉविड संभाव्य दुसऱ्या लाटे संदर्भातील प्रशासनाची पूर्वतयारी, महा राजस्व अभियानमध्ये केलेली कार्यवाही इत्यादी बाबींचा समावेश होता. विविध प्रकरणांमध्ये नोटीस बजावण्यासाठी टपालाद्वारे पत्र पाठवले जात असल्यामुळे त्यात होणारा वेळ वाचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये व्हाट्सअप द्वारे नोटिसेस पाठवण्याचा अभिनव उपक्रम लवकरच सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी महसूल मंत्री यांना दिली. कोरोनाबाबत जिल्ह्याची परिस्थिती बघता मृत्यू दर १.६५ टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्के आहे. मृत्यूदराबाबत राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ३० वा क्रमांक आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील संसर्गबधितांमध्ये घट झाली आहे. जिल्ह्यात रेमडीसीव्हीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच दिवाळी आणि वाढणारी थंडी यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनामार्फत त्या दृष्टीने व्यवस्थापन करण्यात आले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी दिली.

Exit mobile version