Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोल्हापूर आणि नाशिकला ग्राम स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

(छायाचित्र प्रतीकात्मक )

नवी दिल्ली, दि. १९ : स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गंत सर्वंकष आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांना आज राष्ट्रीय पुरस्काराने स्ममानित करण्यात आले.

जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने दूरदृष्य प्रणालीच्यामाध्यमातून सरपंच संवाद आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि राज्यमंत्री  रतनलाल कटारिया व विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत अनेक निकष ठरविण्यात आलेले आहेत. ज्या जिल्ह्यांनी सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा २० जिल्ह्यांना आज राष्ट्रीय पुरस्काने सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठरविलेल्या निकषांमध्ये १०० % हगणदारी मुक्त जिल्हा असणे, वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतेविषयी स्थानिकांमध्ये अधिकाधिक जागृकता निर्माण करणे, त्यांना योग्य ती माहिती पुरविणे, त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांच्याशी संवाद वाढविणे याबांबीचा समावेश आहे.

 

नाशिक जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर आणि कोल्हापूर जिल्हा‍ परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी दूरदृष्य प्रणालीच्यामाध्यमातून केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्याशी सवांद साधला.

नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आनंद व्यक्त करीत संबंधित जिल्हा परिषदांच्या पदाधिकारी, अधिकारी व सर्व यंत्रणेने केलेल्या श्रमाची ही फलश्रुती असल्याचे व्यक्त केले. २ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात राज्याला ५ पुरस्कार मिळाले होते, ग्रामीण स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र यापुढेही अग्रेसरच राहील आणि राज्यातील ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावेल यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रयत्नशील राहील, असा विश्वास श्री. पाटील यांनी  व्यक्त केला.

 

Exit mobile version