कापसावरील गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी संशोधन गरजेचे

कापूस उत्पादक शेतकरी कापसावर पडणाऱ्या गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड अळीसारख्या रोगांमुळे अनेकदा अडचणीत येतो. या रोगांमुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रे यांनी विशेष लक्ष देऊन संशोधन करावे, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केल्या.

विधानभवनात कापूस बियाण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली.

विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले म्हणाले, मराठवाडा, विदर्भ या भागात कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कापसावर गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड अळीसारखे रोग पडल्यास शेतकरी अडचणीत येतात. त्यामुळे भौगोलिक परिस्थिती आणि हवामान आधारित कापूस पीकपद्धतीचा अभ्यास करुन कृषी विद्यापीठाने याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधन करावे व विशिष्ट कालमर्यादेत उपाययोजना सुचवाव्यात. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा. बियाण्यांच्या तक्रारीसंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही श्री.पटोले यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती इतर राज्यांपेक्षा पोषक असून अन्नदाता शेतकरी समृद्ध होण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कृषी विद्यापीठांनी नवनवीन हवामान आधारित पीक पद्धती विकसित कराव्यात, असेही श्री.पटोले यांनी सांगितले.

यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, कृषी विभागाचे सह सचिव गणेश पाटील, कृषी संचालक दिलीप झेंडे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास भाले, तसेच प्रा.सुशिला मोराळे, देवानंद पवार, संजय लाखे, बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, कृषी संशोधक, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.