Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सेंद्रीय शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान

ए. एस. अ‍ॅग्री अ‍ॅण्ड कल्याणी वेअर हाऊस मधील पॉलीहाऊसला राज्यपालांची भेट

ए. एस.अ‍ॅग्री समुह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सेंद्रिय शेतीचे प्रयोग व त्यातील आधुनिक तंत्रज्ञान सामान्य शेतकर्‍यांसाठी वरदान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे.

आज इगतपुरी घोटी येथील ए. एस.अ‍ॅग्री व कल्याणी वेअर हाऊसच्या भेटी दरम्यान राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, इगतपुरीचे प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, ए.एस.अ‍ॅग्री समुहाचे मुख्य संचालक प्रशांत झाडे, साईनाथ हाडोळ, संदेश खामकर, शिरीष पारकर यांच्यासह ए. एस.अ‍ॅग्री समुहाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, कमी जागेत सेंद्रिय पध्दतीने जास्त उत्पादन घेण्याचा ए. एस.अ‍ॅग्री समुहाने उभारलेला प्रकल्प उल्लेखनीय आहे. अशाच प्रकल्पांच्या माध्यमातून सामान्य शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

ए. एस.अ‍ॅग्री व कल्याणी वेअर हाऊसच्या प्रकल्पाच्या तीन पॉलीहाऊसला राज्यपाल यांनी भेट दिली. त्यावेळी त्या पॉलीहाऊस मध्ये उत्पादित करण्यात आलेल्या हळद, तांदूळ, केळी, फळभाज्या, मत्स्यपालन अशा विविध पिकांवर व प्रकल्पांवर करण्यात आलेल्या प्रयोगांची तेथील संचालक मंडळातील श्री. हाडोळ यांनी यावेळी माहिती दिली.

Exit mobile version