Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

राज्यात १८ डिसेंबर रोजी ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’

मुंबई, दि. १६ : राज्यात शुक्रवार, दिनांक १८ डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकसहभागाबाबत योग्य खबरदारी घेऊन या संदर्भातील कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभाग आणि अल्पसंख्याक आयोगामार्फत करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाबाबत आवश्यक ती खबरदारी घेत विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि विविध संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.

संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करुन प्रसृत केला. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतच्या वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक वर्षी 18 डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्याक हक्क दिवस” म्हणून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबविण्यात येतो.

या दिवसाच्या अनुषंगाने अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव, माहिती देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने वेबिनारसारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत.

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना ऑनलाईन व्याख्याने, चर्चासत्रे, वेबिनार इत्यादी पद्धतीने प्रसिद्धी देण्यात येणार आहे. राज्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी सर्व जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या असून जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे  काटेकोर पालन करून ऑनलाईन वेबिनार इत्यादीद्वारे जास्तीत जास्त व्याख्यानमाला, परिसंवाद, चर्चासत्र इ. कार्यक्रम आयोजित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version