Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

रोगप्रतिबंधक औषधे वितरीत करण्यासाठी आयुष मंत्रालयाची मोहीम

कोरोना विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधे

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आपल्या उपक्रमांची मालिका सुरू ठेवत, आयुष मंत्रालयाने आज नवी दिल्ली येथे आयुष प्रतिबंधक औषधे तसेच आहार आणि जीवनशैलीसंबंधी मार्गदर्शक तत्वे लिखित स्वरूपात वितरित करण्याची मोहीम सुरू केली. आयुष आणि बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि आयुष व महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ मुंजपारा महेंद्रभाई यांनी संयुक्तपणे या मोहिमेची सुरुवात केली.

पुढील वर्षभरात, रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे आणि कोविड -19 चा मुकाबला करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे देशभरातील 75 लाख लोकांना वितरित केली जातील, ज्यात वयस्कर (60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील) आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

कोविड -19 साठी आयुर्वेद रोगप्रतिबंधक औषधांच्या किटमध्ये संशमणी वटी असते, ज्याला गुडूची किंवा गिलोय घन वटी (गुळवेल) असेही म्हणतात आणि अश्वगंधा घन वटी देखील असते. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक मेडिसिन (सीसीआरएएस) ने किट आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

रोगप्रतिबंधक औषधे तसेच आहार आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शक तत्वे वितरित करण्याची मोहीम म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने सुरू केलेल्या आझादी का अमृत महोत्सव मोहिमेचा एक भाग आहे. वर्षभर चालणारी ही मोहीम ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू राहील जेव्हा भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करेल.

“हेल्थ फॉर ऑल” अर्थात सर्वांसाठी आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून आणि मोहिमेद्वारे योगदान देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सर्बानंद सोनोवाल यांनी त्यांच्या आभासी संवादादरम्यान सांगितले. महामारी विरोधात लढा देण्यासाठी पंतप्रधानांनी सात आव्हाने सूचिबद्ध केली असून त्यात वयस्कर लोकांची काळजी घेणे हे अग्रस्थानी आहे असे ते म्हणाले.

Exit mobile version