राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी तब्बल 50 हजार पदांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
हिवाळी अधिवेशनाच मंगळवारी (दि.28) सूप वाजलं. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृह विभाग आणि पोलीस दल यांसदर्भातील चर्चेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी मान्य केले. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी 60 हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी 10 हजार पोलिसांची भरती झाली आहे. आता उर्वरित 50 हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, भ्रष्टाचाराचा कहर झाला असून, महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केली होती. त्याला गृहमंत्री पाटील यांनी उत्तर देताना महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची कबुली दिली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा केला आहे. त्यातील फाशीच्या शिक्षेबाबत वेगवेगळी मते आहेत. परंतु, सरसकट फाशीच्या शिक्षेची तरतूद नसून, अत्यंत घृणास्पद कृत्यासाठी ही तरतूद केल्याचे पाटील म्हणाले. त्यांनी सांगितले.