Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची बैठक

पुणे दि.२०: महिला शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी चारही कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेण्यासह शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करावे, असे आवाहन कृषिमंत्री  दादाजी भुसे यांनी केले.

उद्यानविद्या महाविद्यालयाच्या चिमा सभागृहात आयोजित महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १०६ व्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, राज्यपाल नियुक्त कृषी परिषदेचे सदस्य कृष्णा लव्हेकर, कृषी परिषदेचे अशासकीय सदस्य मोरेश्वर वानखेडे व अर्चना पानसरे, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने आदी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, २०२२ हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे. महिला शेतकऱ्यांबाबत धोरण तयार करण्यात येणार असून यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, तसेच वृक्षशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्न मिळू शकेल का, यासंदर्भातही चारही कृषी विद्यापीठांनी अभ्यास करावा.

सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. राज्यातील सेंद्रिय शेतीला गती देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी याबाबतचा अहवाल सादर करावा.  सेंद्रिय शेतीबाबतचे किफायतशीर प्रारुप (मॉडेल) शेतकऱ्यांसमोर घेवून जाण्याची गरज असून त्यादृष्टीने विद्यापीठांकडून प्रयत्न व्हावेत. तसेच  विद्यापीठस्तरावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्यादृष्टीने उपक्रम राबवावे,  असेही श्री. भुसे म्हणाले.

यावेळी शिक्षण व संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी शिक्षण व संशोधन शाखा, विस्तार शिक्षण संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी विस्तार शिक्षण व साधन सामुग्री विकास शाखा आणि प्रशासन सहसंचालक सुभाष बोरकर यांनी प्रशासन शाखेची माहिती सादरीकरण दिली.

बैठकीस कृषी विभागाचे सहसचिव बाळासाहेब रासकर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.एस.आर.काळपांडे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.डी.आर.कदम आदी उपस्थित होते.

Exit mobile version