Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

प्रतिकूल पर्यावरणात तग धरणाऱ्या पीक उत्पादनाबद्दल भारत आणि ब्रिटनमध्ये बैठक

‘प्रतिकूल पर्यावरणात तग धरू शकणाऱ्या अन्नधान्य पिकांचे उत्पादन’ या विषयावर, भारत आणि इंग्लंडदरम्यान आभासी पद्धतीने झालेल्या संयुक्त बैठकीत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वीविज्ञान, पंतप्रधान कार्यालय विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी आपले विचार मांडले. अन्न सुरक्षा साध्य करणे  आणि उपासमारी नाहीशी करणे, या  उद्दिष्टांसाठी   दोन देशांमध्ये दृढ समन्वय असण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ जितेंद्र सिंह यांनी केले.

विज्ञानाचे विविध पैलू, जसे कृषिक्षेत्र,वैद्यकशास्त्र, अन्न,औषधनिर्माण, अभियांत्रिकी किंवा संरक्षण  अशा विषयांबाबत भारत आणि इंग्लंड यांनी जागतिक स्तरावर अधिक सहकार्यासाठी आवाहन करायला हवे, असे मत डॉ सिंह यांनी व्यक्त केले.केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय कृषि-अन्न जैवतंत्रज्ञान संस्था (NABI),मोहाली आणि इंग्लंडमधील बर्मिंगहॅम विद्यापीठाने संयुक्तरित्या या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या आयोजनासाठी, न्यूटन भाभा निधी आणि ब्रिटिश कौन्सिल यांनीही पाठिंबा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, देशातील आणि जगातीलही सर्व नागरिकांचे पोट भरता येईल, एवढे शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारताचे सुरु असलेले प्रयत्न अभूतपूर्व आहेत,  अगदी महामारीच्या काळातही देशातील कोणीही व्यक्ती उपाशी राहणार नाही, याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घेतली. त्याशिवाय, छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक अशी धोरणे देखील तयार करण्यात आली आहेत. तसेच, अन्न सुरक्षेत मोलाचे योगदान देणाऱ्या स्थानिक पिकांचे संरक्षण-संवर्धन करण्याचे कामही सरकारने हाती घेतले आहे, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

मानवजातीच्या कठीण काळात समस्यांचे निराकरण करण्यासाठी विज्ञान हेच सर्वात मोठे साधन आहे, हे कोविड काळात आपल्याला समजून चुकले आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणले. भारतीय विज्ञानाने इतक्या उच्च धोका असलेल्या/विनाशकारी रोगावर इतक्या कमी वेळात लस तयार करून आपली क्षमता सिद्ध केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण आपल्या कल्पना भारतापुरत्या मर्यादित न ठेवता, त्या जागतिक स्तरावर नेल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

शाश्वत अन्न उत्पादनाच्या प्रश्नावर बोलताना डॉ जितेंद्र सिंग म्हणाले, दक्षिण आशियाई क्षेत्राला सातत्याने कमी होत असलेल्या सुपीक जमिनीची समस्या भेडसावत आहे, त्याशिवाय जागतिक हवामान बदलाच्या समस्येचे निराकरण करणे देखील गरजेचे आहे.

Exit mobile version