माझी शेती माझा सातबारा; मीच लिहिणार माझा पिकपेरा

निफाड  (दीपक श्रीवास्तव ) : महाराष्ट्र शासनाच्याया नाविन्यपूर्ण योजनेचे क्षेत्रीय प्रात्यक्षिक तहसीलदार शरद घोरपडे आणि तालुका कृषी अधिकारी भटू पाटील निवासी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी निफाड येथे दाखविले. महाराष्ट्र शासनाच्या ई पीक पाहणी या मोबाईल ॲप द्वारे पिक पेरणी ची माहिती तलाठी कार्यालयात न जाता शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकांची सात-बारावर नोंदणी करू शकणार आहे.

याबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी तालुक्यातील तलाठ्याची कार्यशाळा घेण्यात आली होती. निफाड शिवारातील एका शेतावर प्रत्यक्ष जाऊन तहसील दारांनी स्वत: ही कार्यशाळा घेतली. यासंबंधीच्या तांत्रिक मार्गदर्शनाची कार्यशाळा निफाड पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. शेतकऱ्यांनी या ॲपद्वारे आपल्या शेतातील पीक पेरणी ची माहिती शासनाकडे नोंदवावी असे आवाहन तहसीलदार श्री घोरपडे आणि तालुका कृषी अधिकारी श्री पाटील यांनी केले आहे. एक ऑगस्ट पासून राज्यभरात ही सुविधा देण्यात येणार आहेत.

याबाबतचा पहिला प्रयोग दिंडोरी तालुक्यात राबविण्यात आलेला आहे. या कार्यशाळेमध्ये निफाड तालुक्यातील तलाठी निखील शिरोडे आणि संतोष हिरे यांनी प्रमुख प्रशिक्षक म्हणून प्रात्यक्षिके सादर केली निफाड तालुक्यातील सर्व व मंडल अधिकारी आणि तलाठी तसेच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी या कार्यशाळेत उपस्थित होते.