हर्सूल तलाव भरण्यासाठी एका मोठ्या पावसाची प्रतीक्षा

औरंगाबाद शहरातील निजामाच्या राजवटीतील ऐतिहासिक हर्सूल तलाव भरण्यासाठी एका मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मागील २४ तासांमध्ये तलावाची पाणीपातळी फक्त दोन इंचांनी वाढली. २८ फूट पाणीपातळी झाल्यावर तलावातील पाणी खाम नदीपात्रातून वाहते. पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळावा म्हणून रविवारी महापालिकेने पात्रातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. तत्पूर्वी , महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाणीपातळीचा आढावा घेतला.

महापालिकांने शनिवारी रात्री भोंगे लावून खाम नदीपात्रालगतच्या वसाहतींमधील नागरिकांना स्वत : हून स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. १४ वर्षांपूर्वी नदीपात्रात मोठा पूर आल्याने महापालिकेने नागरिकांना स्थलांतरित केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठे स्थलांतरित व्हावे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. तलावाची पातळी शनिवारी रात्री वाढली नाही.

मात्र, महापालिकेने रविवारी सकाळपासून पात्रातील खड्डे बुजविणे सुरू केले. पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळावा हा उद्देश असल्याचे कार्यकारी अभियंता धांडे यांनी सांगितले. हर्सूल तलाव ओसंडून वाहणार, असे भाकीत महापालिकेने केले होते. त्यामुळे शेकडो नागरिक रविवारी तलावाच्या पात्राजवळ गेले. दोन फुटांनी पाणी वाढल्यावर पात्रात पडेल, असे उपअभियंता अशोक पद्मे यांनी सांगितले.