मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
औरंगाबाद, दि.17, :- मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून व त्यांनी सहन केलेल्या अत्याचारातून ही भूमी रझाकारांच्या जोखडातून मुक्त झाली आहे. मराठवाड्यासाठी आजचा दिवस स्वातंत्र्यदिन आहे. या आंदोलनामध्ये जसा मराठवाडा सहभागी झाला होता तसेच आता आपण कोरोना विषाणू उच्चाटनासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेत येथील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. त्यातही आपल्या सर्वांचा सहभाग हवा, असे सांगून त्यांनी औरंगाबादच्या विकासासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा मानसही बोलून दाखवला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री श्री.ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मुंबई येथून सहभागी झाले होते. या ठिकाणाहूनच त्यांनी जनतेला उद्देशून शुभेच्छापर संदेशातून मार्गदर्शन केले.
ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिका प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आदींची उपस्थिती होती.
मराठवाड्याच्या विकासासाठी, सुखसमृद्धीसाठी निश्चित प्रयत्न करीन
मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले की, मराठवाडा जिद्दी, चिवट, हिम्मतवंतांचा आहे. मराठवाडा विकासाच्या दिशेने चालला आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी आपल्या सरकारने निश्चितपणे घेतली आहे.
मुंबई ते नागपूर या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मराठवाडा समृद्ध होणार आहे. मुंबई, पुण्याला ज्याप्रमाणे विकास प्राधिकरण आहे त्या पद्धतीने औरंगाबाद विकास प्राधिकरण करण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल. मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की, मी माझा मराठवाडा कोरोनामुक्त करेन आणि मराठवाड्याच्या विकासासाठी, सुखसमृद्धीसाठी निश्चित प्रयत्न करीन.
सुरुवातीला स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन पालकमंत्री व मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलाकडून बँड, बिगूल वाजवून व बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री व मान्यवरांनी स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते मनपा अधिकारी-कर्मचारी यांच्या सहयोगाने रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात आले.