Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

राज्यात गेल्या १० वर्षातील विक्रमी कापूस खरेदी

राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनदेखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. आज या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले.

या खरेदीचे एकूण मूल्य 11,776.89 कोटी रुपये असून आतापर्यात 11,029.47 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.  तसेच सीसीआयने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे.

राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोविड-19 च्या प्रादुभावापूर्वी अनुक्रमे 91.90 व 54.03 लाख क्विंटल कापूस खरेदी. अशा प्रकारे एकूण 145.93 क्विंटल कापूस खरेदी केली.

कोविड-19 च्या प्रादुभावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यामुळे, शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता.  त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोविड-19 च्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आजपर्यंत अनुक्रमे 35.70 व 36.75 लाख याप्रमाणे 72.45 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे.

राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी 418.8 लाख क्विंटल झाली असून वास्तविक पाहता 410 लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती.  एकूण 8 लाख 64 हजार 72 शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला.

Exit mobile version