शिवभोजन थाळी आता पाच रुपयांत, तर प्रशासकांचा कालावधी वाढविला

शिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी 5 रुपये

शिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2021 पर्यंत 5 रुपये एवढा करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबर पासून पुढील 6 महिन्यासाठी हा दर लागू राहील. जानेवारी 2020 पासून 10 रुपये एवढ्या दराने शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत होती. कोरोनामुळे मार्च पासून या थाळीची किंमत 5 रुपये एवढी करण्यात आली. सध्या एकूण 906 शिवभोजन केंद्रांमधून थाळ्यांचे वितरण होते. ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 2 कोटी थाळ्या वितरित करण्यात आल्या आहेत.

स्थानिक संस्थांमधील प्रशासकांचा कालावधी वाढविला

कोविडच्या पार्श्वभूमीवर नजिकच्या काळामध्ये निवडणुका न झालेल्या 12 नागरी स्थानिक संस्थांमधील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी 6 महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या अनुषंगाने अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल.

मे व जून 2020 मध्ये मुदत संपलेल्या 3 महानगरपालिका, 8 नगरपरिषदा व एका नगरपंचयायतीच्या निवडणुकीची प्रक्रीया कोविडमुळे स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या सूचनेप्रमाणे या संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियक व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये प्रशासकाचा कालावधी 6 महिन्यापेक्षा जास्त करण्यासंदर्भात सुधारणा करणे गरजेचे होते.

मंत्रिमंडळाचे इतर निर्णय

माजी सैनिक, विधवांकरिता घरपट्टी, मालमत्ता कर माफीसाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना राबविणार

राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफीच्या योजनेस मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

रायगडमध्ये बल्क ड्रग पार्क, औरंगाबाद येथे वैद्यकीय उपकरण पार्कसाठी विशेष प्रोत्साहने देणार

रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क आणि औरंगाबाद येथे ऑरिक सिटीमध्ये वैद्यकीय उपकरण पार्कसाठी विशेष प्रोत्साहने देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे राज्यामध्ये वैद्यकीय उपकरण तसेच औषधी उत्पादनास मोठा वाव मिळणार आहे. राज्याची बल्क ड्रग पार्क व वैद्यकीय उपकरणे निर्मिती पार्क याची प्रकल्प किंमत रु. 2442 कोटी इतकी तर वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्कची प्रकल्प किंमत 424 कोटी रुपये इतकी आहे.

मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जलद पुनर्विकासाकरिता नवीन मार्गदर्शक सूचना देण्याचा निर्णय

मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासाकरिता 11 सप्टेंबर 2019 चा शासन निर्णय रद्द करून नवीन मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागविणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्याची निविदा प्रक्रीया रद्द करून नव्याने निविदा मागविण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेचे बळकटीकरण

 सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत शाखेचा नवा आकृतीबंध मंजूर करण्यास  आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.  यामुळे विद्युत शाखेचे बळकटीकरण होणार आहे.