विधानसभा अध्यक्ष कोरोनाग्रस्त; अधिवेशनावर संसर्गाचे सावट

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन कोरोना संसर्गाची काळजी घेत  येत्या सोमवार आणि मंगळवारी केवळ दोन दिवस होवू घातले आहे. मात्र याअधिवेशनात मुख्यमंत्र्यासह सहभागी होणा-या सर्वाना कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आले तरच प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी विधानभवनाबाहेर उद्यापासून सर्वाना चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याने पावसाळी  अधिवेशनावर अनिश्चितीचे सावट आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यानी समाज माध्यमांवर संदेश देवून  आपली कोरोना लक्षणे जाणवल्याने चाचणी केली त्यात कोरोनाचे निदान झाल्याचे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदार संघात पूर स्थिती असल्याने आपण दौ-यावर होतो या काऴात त्रास जाणवल्याने चाचणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान सोमवारी होणा-या अधिवेशनात पटोले यांच्या सह अनेक आमदार मंत्री देखील कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याने गैरहजर राहण्याची शक्यता असल्याने अधिवेशन होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. कदाचित विधानसभा उपाध्यक्षांच्या माध्यमातून कामकाज पूर्ण करण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला तर वैधानिक सोपस्कार पूर्ण कैल जातील, दरम्यान विधिमंडळ अधिवेशनाच्या घोषित कार्यक्रमानुसार पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव आणि कामकाजाचे मुद्दे पटलावर ठेवण्यात येणार आहेत त्यात विनीयोजन विधेयके शासकीय कामकाज आणि पुरवणी मागण्या इतकेच कामकाज घेण्यात येणार आहे.