Maharashtra Budget : रोजगार हमीसाठी १ हजार ७५४ कोटी, फलोत्पादनासाठी ५४० कोटी रुपयांची भरीव तरतूद 

मुंबई, दि.11 :रोजगार हमी योजनेसाठी सन 2022-23 मध्ये 1 हजार 754 कोटी आणि फलोत्पादनासाठी 540 कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी अर्थसंकल्पाविषयी दिली.

43 हजार 902 सिंचन विहिरींची कामे

सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रमांतर्गत नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात 24 हजार ६१४ सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 43 हजार 902 सिंचन विहिरींची कामे हाती घेतली आहेत.

यावर्षी 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दीष्ट

फळबाग लागवड योजनेंतर्गत फळबाग लागवडीच्या सुधारित धोरणानुसार या योजनेत केळी, ड्रॅगन फ्रुट, ऍव्हॅकॅडो, द्राक्षे आदी फळ पिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश करण्यात येत आहे. यावर्षी १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दीष्ट आहे.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेस पूरक निधी

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेमधून रस्त्यांच्या कामातील कुशल भागासाठी रोजगार हमी योजनेतून पूरक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे स्वागतार्ह असल्याचे श्री.भुमरे यांनी सांगितले.