Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गव्हाच्या नव्या वाणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट

नव्याने विकसित झालेला सामान्य गहू किंवा पोळीचा गहू, म्हणजेच अस्टिव्हियम जातीच्या या गव्हाचे पिक केवळ 110 दिवसांत तयार होते तसेच अनेक प्रकारच्या किडींपासून प्रतिरोधक क्षमताही या वाणाचे वैशिष्ट्य

भारतीय वैज्ञानिकांनी गव्हाचे खूप जास्त प्रमाणात पिक घेता येईल, असे नवे वाण विकसित केले आहे. शेतकऱ्यांना या वाणाचा लाभ होत असून, त्याच्या पिठाच्या  पोळ्या/चपात्या देखील उच्च दर्जाच्या आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेअंतर्गत असलेल्या पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी गव्हाचे MACS 6478 हे वाण विकसित केले आहे. या वाणाच्या लागवडीनंतर, महाराष्ट्रातील करंजखोप गावातील शेतकऱ्यांना गव्हाचे दुप्पट उत्पन्न मिळाले आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या या गावातील शेतकऱ्यांना आता या वाणामुळे प्रती हेक्टर 45-60 क्विंटल गव्हाचे उत्पन्न झाले आहे. याआधी त्यांना हेक्टरी केवळ 25-30 क्विंटल गहू मिळत असे. आधी हे शेतकरी लोक-वन, एच डी 2189 आणी इतर जुनी बियाणे लावत असत.

MACS 6478 grain.jpg       MACS 6478 plot at Karnjkhop(Satara) village on farmer field 2.JPG

या वाणाची वैशिष्ट्य

नव्याने विकसित झालेले हे गव्हाचे वाण, ज्याला सामान्य गहू किंवा पोळी/चपातीचा गहू म्हणून ओळखले जाते, त्यालाच वैज्ञानिक परिभाषेत, अस्टिव्हियम जातीचा गहू म्हटले जाते. हा गहू केवळ 110 दिवसांत तयार होतो. तसेच गव्हाच्या पानांवर अथवा दांड्यावर येणाऱ्या अनेक प्रकारच्या किडीला रोखण्याची क्षमता त्यात आहे. या गव्हाळवर्णी मध्यम आकाराच्या जातीत, 14 टक्के प्रोटीन, 44.1 पीपीएम जस्त आणि 42.8 पीपीएम लोह आहे, जे इतर विकसित वाणांपेक्षा जास्त आहे. या गव्हाच्या वाणाच्या संशोधनाविषयीचा प्रबंध “इंटरनैशनल जर्नल ऑफ करन्ट मायक्रोबायोलॉजी अँड अप्लाईड सायन्सेस” मध्ये प्रसिध्द झाला आहे.

या गव्हाच्या पोळ्या अत्यंत उत्तम दर्जाच्या होतात आणि त्या बाबतीत या गव्हाची गुणवत्ता 8.05 गुण असून ब्रेडसाठी या गव्हाचा दर्जा 6.93 गुण इतका आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे संस्था, ‘महाबीज’ आता MACS 6478 जातीच्या या गव्हाचे प्रमाणित बियाणे विकसित करणार आहे, जेणेकरून सर्व शेतकर्यांना त्याचा लाभ मिळेल.

माजी बियाणे प्रमाणन अधिकारी आणि आघारकर संस्थेच्या सहकार्यामुळे आतापर्यंत 10 शेतकऱ्यांनी 14 एकर शेतजमिनीवर या वाणाचे पिक घेतले आहे. करंजखोपच्या शेतकऱ्यांनी स्वतःची एक कंपनी स्थापन करुन आणखी बियाणे उत्पादन करण्याचा निश्चय केला आहे.

“आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी काहितरी चेतना मिळण्याची गरज होती, आणि ती चेतना, प्रेरणा आम्हाला आघारकर संस्थेने विकसित केलेल्या MACS 6478 यातून मिळाली आहे. आता आम्ही मागे वळून बघणार नाही”, अशी प्रतिक्रिया, हा संपूर्ण बदल स्वतः बघणारे शेतकरी, रमेश जाधव यांनी दिली आहे.

सामान्य शेतकऱ्यांना कसे  मिळणार?

‘महाबीज’ आता MACS 6478 जातीच्या या गव्हाचे प्रमाणित बियाणे विकसित करणार आहे, जेणेकरून सर्व शेतकर्यांना त्याचा लाभ मिळेल. शिवाय करंजखोपच्या शेतकऱ्यांनी स्वतःची एक कंपनी स्थापन करुन आणखी बियाणे उत्पादन करण्याचा निश्चय केला आहे.

संपर्क : 

आधारकर संशोधन संस्था,

गोपाल गणेश आगरकर मार्ग, पुणे, महाराष्ट्र,

फोन क्रमांक :  + 91-20-25325000 / + 91-020-25653680
इमेल : info@aripune.org

संकेतस्थळ : http://www.aripune.org/

Exit mobile version