निफाड तालुक्यात कोरोनामुळे १८ गावे प्रतिबंधित घोषित

निफाड ( प्रतिनिधी ) :  निफाड तालुक्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने निफाडच्या प्रांत अधिकारी डॉक्टर अर्चना पाठारे यांनी तालुक्यातील १८ गावे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. या ठिकाणचे सर्व दैनंदिन कामकाज ठप्प होणार असून याठिकाणी संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. सर्व व्यवहार व्यापार कार्यालय उद्योग हे पुढील आदेश मिळेपर्यंत संपूर्णपणे बंद केले असून गावात येण्याजाण्याचे मार्ग बंद करून नाकाबंदी चा आदेश जारी करण्यात आला आहे.

शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार निफाड तालुक्यातील उगाव, रानवड, शिंपी टाकळी, खेरवाडी, वनसगाव, मौजे सुकेने, पिंपळस, कोठुरे, टाकळी, नांदुर्डी, शिवडी, म्हाळसाकोरे, करंजगाव, औरंगपूर, चापडगाव, रानवड, शिरवाडे वणी, नारायण टेंभी व पालखेड या गावांचा समावेश आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंध अधिनियम नुसार पुढील आदेश येईपर्यंत या गावांमधील सर्व आस्थापना व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात यावेत, संपूर्ण संचारबंदी करण्यात यावी, प्रतिबंधित क्षेत्राची नाकाबंदी करण्यात येऊन गावात येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवण्यात यावी, गृह विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची नोंद ठेवण्यात येऊन त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे असेही आदेश दिले आहेत. या कालावधीत लोकांची अडचण होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरवण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असुन मदत केंद्राची देखील स्थापना करण्यात येणार आहे. तालुक्यामध्ये रोग नियंत्रणासाठी प्रतिसाद पथकाची स्थापना करण्यात आली असून त्यात तहसिलदार गट विकास अधिकारी पोलीस निरीक्षक तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांचा समावेश आहे.

निफाड तालुक्याचे संपर्क अधिकारी डॉक्टर चेतन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत निफाड तालुक्यात 6731 रुग्णांची नोंद घ्यावी असून त्यापैकी 5199 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 187 रुग्णांचा निफाड तालुक्यात कोरोणामुळे मृत्यू झालेला असून 1343 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. निफाड तालुक्यातील लासलगाव आणि पिंपळगाव येथे हेल्थ सेंटरची व्यवस्था असून पिंपळगाव येथे कोवीड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. निफाड येथे देखील कोवीड केअर सेंटर मंजुर असून अद्याप कार्यान्वित झालेले नाही.