मुंबई, दि. 8 : जगभरात ओढवलेले कोरोनाचे संकट आणि जागतिक मंदी या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आणि वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत राज्याचा सन 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला.
तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय महिलादिना निमित्ताने राज्यातील महिलांना शुभेच्छा देतांना महिलांच्या घराच्या स्वप्नपुर्तीसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का कर सवलतीची विशेष योजना या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. वर्षभर कराव्या लागलेल्या कोरोनाच्या संकटाचा उल्लेख करुन श्री.पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या कोविड योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शाश्वत कृषी विकासासाठी
- तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा
- कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित.
- शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी देण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल.
- थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना 33 टक्के सूट, ऊर्वरित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरीक्त माफी, 44 लाख 37 हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के, 30 हजार 411 कोटी रूपये रक्कम माफ.
- शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजित किंमतीचा मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प .
- प्रत्येक तालुक्यात किमान एक, याप्रमाणे सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार.
- राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या 3 वर्षात 600 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणार.
- शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा कुक्कुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींगकरता अनुदान.
- कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागास 3 हजार 274 कोटी रुपये नियतव्यय