केंद्र सरकार, राज्य सरकारचे निवृत्त कर्मचारी, ईपीएफओ आणि इतर शासकीय संस्थांना निवृत्तीवेतनासाठी हयात प्रमाणपत्राची आवश्यकता असते. गोवा टपाल विभागाने ही सुविधा नजीकच्या टपाल कार्यालयात तसेच घरपोच उपलब्ध करुन दिली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन कार्यालय तसेच निवृत्तीवेतन देय संस्थेकडे हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता नाही. आधारकार्डच्या माध्यमातून पेपरलेस डिजीटल जीवन प्रमाणपत्र देता येते. 70 रुपये शुल्क आकारुन ही सुविधा पुरवण्यात येते. निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन आयडी, पेन्शन पेमेंट ऑर्डर, पेन्शन देय विभागाचे नाव, बँक खात्याचा तपशील, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी तसेच आधार या बाबींचा तपशील द्यायचा आहे.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबाईलवर हयात प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच निवृत्तीवेतन विभागाकडे तात्काळ याची अद्ययावत नोंद होईल. निवृत्तीवेतनधारकांनी टपाल खात्याच्या मोबाईल ऍपवर किंवा http://ccc.cept.gov.in/covid/request.aspx या संकेतस्थळावर घरपोच सेवेसाठी विनंती करावी, असे आवाहन टपाल खात्याने केले आहे. अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी गणेश कुमार, मोबाईल क्रमांक 7477055285 यांच्याकडे संपर्क साधावा.