उद्या कोविड-19 लसीकरणाचा शुभारंभ; देशात सक्रिय रुग्णसंख्या २.१३ लाखावर

पहिल्या दिवशी प्रत्येक ठिकाणी सुमारे 100 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारी 2021 रोजी  सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात कोविड 19  लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. हा संपूर्ण जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असेल ज्याची व्याप्ती संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत असेल. याप्रसंगी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 3006 ठिकाणे आभासी पद्धतीने जोडली जातील. पहिल्या दिवशी प्रत्येक ठिकाणी सुमारे 100 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाईल.

हा लसीकरण कार्यक्रम लसीकरण करण्याच्या प्राधान्य गटांच्या तत्त्वांवर आधारित आहे आणि आयसीडीएस कामगारांसह सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना  या टप्प्यात ही लस मिळेल.

लसीकरण कार्यक्रमात को-विन हा  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेला एक डिजिटल प्लॅटफॉर्म वापरला जाईल, ज्यायोगे लसीचा साठा, साठवणूक करण्यासाठी आवश्यक तापमान याबाबत वास्तविक माहिती आणि कोविड-19 लसीसाठी  लाभार्थींचा वैयक्तिकरित्या मागोवा घेण्यास मदत होईल. हा डिजिटल प्लॅटफॉर्म लसीकरण सत्र आयोजित करताना सर्व स्तरातील कार्यक्रम व्यवस्थापकांना मदत करेल.

कोविड 19 महामारी, लसीकरण सुरुवात आणि को-विन सॉफ्टवेअरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक समर्पित 24×7 कॉल सेंटर – 1075 – देखील स्थापन करण्यात आले आहे.

नागरी विमान वाहतूक  मंत्रालयाच्या सक्रिय सहकार्याने कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या पुरेशा मात्रा यापूर्वीच देशभरातील सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आल्या आहेत.  राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारने त्या पुढे जिल्ह्यांपर्यंत पोहचवल्या आहेत. लोक सहभागाच्या तत्त्वांवर कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

भारतातील सक्रिय रुग्णसंख्या आणखी कमी होऊन 2.13 लाख झाली

भारतात एकूण सक्रीय रुग्णसंख्येत सातत्याने होणारी घट कायम असून आज सक्रिय रुग्णांची संख्या 2.13 लाख (2,13,027) झाली आहे.

भारतामधील सध्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या 2.03% आहे.

गेल्या काही दिवसात देशातील कोविड रुग्णांमध्ये दररोज नव्याने वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 20 हजारहून कमी आहे. गेल्या 24 तासांत दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या 15,590 आहे. गेल्या 24 तासांत 15,975 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी पाठविण्यात आले.

गेल्या सात दिवसांत भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे नवीन रुग्ण संख्या 87 आहे. रशिया, जर्मनी, ब्राझील, फ्रान्स, इटली, अमेरिका आणि युनायटेड किंगडम सारख्या जगातील इतर देशांशी तुलना केली तर ही संख्या  खूपच कमी आहे.

एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10,162,738 आहे. बरे झालेल्या आणि सक्रिय रुग्णांमधील तफावत सातत्याने वाढत असून ती 99 लाखांच्या पुढे गेली आहे आणि सध्या ती, 99,49,711आहे.

नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने आज रुग्ण बरे होण्याचा दर 96.52% पर्यंत सुधारला आहे.

नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी 81.15% रुग्ण हे 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

केरळमध्ये एक दिवसात सर्वाधिक 4,337 रुग्ण बरे झाले आहेय. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात  3,309 तर छत्तीसगडमध्ये 970 रुग्ण बरे झाले.

नवीन रुग्णांपैकी पैकी 77.56% रुग्ण 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

केरळमध्ये एक दिवसात सर्वाधिक 5,490 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 3,579 आणि पश्चिम बंगालमध्ये 680 नवीन रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासांत 191 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

नवीन मृत्यूंमध्ये सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा वाटा 73.30% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (70) मृत्यू तर केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 19 आणि 17 दैनंदिन मृत्यूची नोंद आहे.

गेल्या सात दिवसांत भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे केवळ एक जण दगावल्याची नोंद झाली आहे. यामुळे भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे मृत्युदर 1.44% असून तो जगातील सर्वात कमी मृत्युदरांपैकी आहे.