Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कापूस बोंडअळी नियंत्रण अभियानाला सुरूवात

गुलाबी बोडअळी

गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकरीता तातडीने निंबोळी अर्काची फवारणी करावी – पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

कापूस हे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारे नगदी पीक आहे. विदर्भात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र सध्या गुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. त्याबाबत प्रचार प्रसाराची गरज असून, वाढता प्रादुर्भाव पाहता पोळ्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी तातडीने कपाशी पिकावर निबोंळी अर्काची फवारणी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय मंत्री सुनिल केदार यांनी  केले.

ॲग्रोव्हिजन फाऊंडेशन, साऊथ एशिया बायोटेक सेंटर, रासी सिड्स, पी. आय. फाऊंडेशच्या संयुक्त विद्यमाने कळमेश्वर येथील संत्रा मार्केट सभागृहात गुलाबी बोंडअळी नियंत्रण अभियानाच्या चित्ररथाचे उद्घाटन केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बोरटकर, ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनचे  सचिव डॉ. सी. डी मायी, साऊथ एशिया बायोटेक सेंटर जोधपुरचे संस्थापक संचालक भागीरथ चौधरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, सी. आय. सी. आर.चे संचालक डॉ. वाय. जी.  प्रसाद,  प्रशांत हेगडे. पी. आय फाऊंडेशचे अध्यक्ष डॉ. रामासामी, रासी सिड्सचे अध्यक्ष बाबा कोढे, पंचायत समिती सभापती श्रीमती वाळके, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती कळमेश्वरचे सभापती रमेश मानकर, सुधीर दिवे, आनंदराव राऊत, मिलिंद टिचकुले, प्रशांत कुकडे, श्रीधर ठाकरे, प्रशांत वासाडे, विजय जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतकऱ्यांमध्ये गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी प्रचार-प्रसार करणाऱ्या चित्ररथाला श्री. केदार यांच्याहस्ते यावेळी हिरवी झेंडी दाखविण्यात आली. या चित्ररथाद्वारे दृकश्राव्य माध्यमातून विदर्भाच्या विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना बोंडअळी नियंत्रणाविषयी विस्तृत माहिती देण्यात येईल. हा चित्ररथ विदर्भातील बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त भागात फिरणार आहे. विदर्भातील बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त तालुक्यांमध्ये प्रसिद्धी पत्रके, फलक, आकाशवाणी, बॅनर्स आदींच्या माध्यमातून या व पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव उद्भवून नुकसान होऊ नये, यासाठी जागृती करण्यात येणार आहे. कृषी विज्ञान केंद्राचाही या अभियानात सक्रीय सहभाग राहणार आहे.

2017-18 यावर्षी मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. या अळीमुळे उत्पादन कमी होवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. म्हणून अद्ययावत कृषी तंत्रज्ञान, किटकनाशके उपाययोजना असतांना देखील शेतकऱ्यांपर्यंत बरेचदा योग्य ती माहिती पोहोचत नाही, असे श्री. केदार यांनी सांगितले. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी निसर्गाशी दोन हात करतो, राबराब राबतो, तरी देखील त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण होत नाही. अशी खंत व्यक्त करून श्री. केदार म्हणाले की, कृषी विद्यापीठ व कापूस संशोधन संस्था यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य केले पाहिजे. ग्रामीण अर्थव्यवस्था सशक्त करायची असेल तर कृषी व कृषी संलग्न व्यवसायांना सक्षम करावे लागेल.

कळमेश्वर खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन समिती व पंचायत समिती यांनी समन्वयाने काम करून तालुक्यातील बोंडअळीला नियंत्रणात आणावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनचे सी.डी मायी, सचिव भागीरथ चौधरी, साऊथ एशिया बायोटेक सेंटर जोधपुरचे विलास भाले, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. वाय. जी.  प्रसाद,  सी. आय. सी. आर.चे संचालक प्रशांत हेगडे, कृषी शास्त्रज्ञ श्री. उंदीरवाडे यांनी गुलाबी बोंड अळी नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती दिली.

महाराष्ट्रात कापसाची लागवड साधारण 42 लक्ष हेक्टरवर केली जाते. त्यातील 96 टक्के कापूस उत्पादन हे 20 जिल्ह्यांमध्ये होते. यात विदर्भातील महत्वाचा जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षापासून बीटी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक काही प्रमाणात अडचणीत आले आहे.

गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकरीता बंधन प्रकल्प

ॲग्रोव्हिजन फाऊंडेशन आणि एस. ए. बी. सी गेल्या 4 वर्षापासून विदर्भात बोंडअळी नियंत्रण कार्यक्रम राबवित आहे. शेतकऱ्यांमध्ये गुलाबी बोंडअळी संदर्भात मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण होतांना दिसत आहे. या अभियानात यावर्षी ॲग्रोव्हिजन फाऊंडेशन, एस. ए. बी. सी., रासी सिड्स तसेच पी. आय. फाऊंडेशच्या संयुक्त विद्यमाने बंधन प्रकल्प आदासा, वरोडा व मेटपांजरा या गावात सुमारे 300 एकरवर राबविण्यात येत आहे. गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकरीता हा प्रकल्प देशातला पहिला पायलट प्रकल्प आहे. शेतकऱ्यांनी सोप्यात सोप्या उपाययोजना केल्या तर गुलाबी बोंडअळीचा 100 टक्के नायनाट करता येतो आणि तो या अभियानाच्या माध्यमातून बराचे कमी करता आला आहे. यापुढेही याचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी यावर्षीही हे अभियान राबवित आहे.

Exit mobile version