‘केंद्रीकृत कृषी यंत्रसामुग्री कार्यक्षमता परीक्षण पोर्टल‘चा प्रारंभ

लहान आणि मध्यम शेतकऱ्यांच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या गरजांची पूर्ती करण्याची आवश्यकता – नरेंद्रसिंह तोमर

सार्वजनिक डोमेनवर ‘केंद्रीकृत कृषी यंत्रसामुग्री कार्यक्षमता परीक्षण पोर्टल‘चा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते आज प्रारंभ करण्यात आला.

हे पोर्टल कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाने विकसित केले आहे. याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कृषी यंत्रसामुग्रीचे परीक्षण, चाचणी तसेच मूल्यांकन करणे शक्य होणार आहे तसेच यामध्ये पारदर्शकता आणता येणार आहे.

याप्रसंगी बोलताना नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारे सरकार शेतक-यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. शासनाची ही बांधिलकी लक्षात घेवून त्याच अनुषंगाने अंदाजपत्रकामध्येही कृषी क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. आता कृषी यंत्रांचा वापर करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याचा चांगला परिणाम म्हणजे पिकांचा क्षेत्र विस्तारले आहे तसेच पिके घेण्यामध्ये वैविध्यता आला आहे तसेच देशाचे  कृषी उत्पादनही वाढले आहे. आता यापुढे कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कृषी संबंधित यंत्रे, उपकरणे तयार करणाऱ्या उद्योगांनी नवीन यंत्रसामुग्री तयार करतााना अल्प आणि मध्यम शेतकरी बांधवांना कमी खर्चात यंत्रसामुग्री वापरणे शक्य होईल, अशी उपकरणे तयार करावीत, असे आवाहन तोमर यांनी यावेळी केले.

शेतकरी बांधवांसाठी आज सुरू करण्यात आलेल्या पोर्टलच्या माध्यमातून कृषी यंत्रसामुग्रीच्या परीक्षणाची विनाखंड सुविधा मिळणार आहे. तसेच यंत्रांची देखभाल करणे, तसेच इंटरनेटच्या मदतीने ते यंत्र जोडून त्याच्याविषयी सर्व माहिती घेता येणार आहे. यंत्रसामुग्रीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन केले जाणार असल्यामुळे यंत्रसामुग्रीच्या परीक्षणाची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळणार आहे. या पोर्टलमुळे वापरकर्त्यांना उत्पादक, एफएमटीटीआयएस तसेच डीएसी आणि एफडब्ल्यू यांना  पुढील फायदे मिळणार  आहेत.

  1. उद्योग सुलभतेच्या सरकारच्या धोरणानुसार यंत्राच्या चाचणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा आहे
  2. चाचणीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे
  3. जलद प्रतिक्रिया, अभिप्राय मिळणे शक्य
  4. परीक्षण काळ कमी करण्यास मदत
  5. कृषी उत्पादकांच्या व्यावसायिक खर्चामध्ये बचत
  6. परीक्षण कार्यक्षमतेमध्ये सुधारणा
  7. संपूर्ण चाचणी शक्य
  8. लवचिक कार्यपद्धती-मंत्रालयातील संबंधित अधिकारी आणि उत्पादक इंटरनेटच्या मदतीने कधीही चाचणी कामाचे परीक्षण करू शकणार

 

आता कृषी कार्याचे यांत्रिकीकरण करणे आणि शेतीची कामे अधिक सक्षमतेने करून उत्पादनक्षमता वाढविणे अपरिहार्य आहे. पीक उत्पादन प्रणालीमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटकांचीही क्षमता वाढविणे गरजेचे आहे. तसेच कृषीकार्यात मनुष्यबळाचा वापर कमी करणे, पारंपरिक पिकांच्या बरोबरच नवीन पिकांची लागवड करण्यास मदत करण्याची गरज आहे.

कृषी यंत्रसामुग्रीची चाचणी करणे ही एक कृषी यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. त्याचा लाभ शेतकरी बांधवांना आणि अशी यंत्रे तयार करणाऱ्यांनाही होणार आहे. यंत्रसामुग्रीचे परीक्षण, मूल्यमापन, गुणवत्ता आणि त्यांची कार्यक्षमता यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. यंत्राविषयी तुलनात्मक माहिती उपलब्ध होवू शकणार आहे. तसेच यंत्र निर्मात्यांना आपल्या यंत्रामध्ये राष्ट्रीयच नाही तर जागतिक स्तराचा विचार करून बदल, सुधारणा करून व्यापारीकरणाचे नवीन मार्ग शोधता येणार आहेत. कृषी यंत्रांचे परीक्षण आणि मूल्यांकन यांचे महत्व ओळखून तसेच चाचण्यांची वाढती मागणी लक्षात घेवून कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाने  सध्या असलेल्या चार कृषी यंत्रसामुग्री प्रशिक्षण आणि चाचणी संस्थांव्यतिरिक्त राज्य कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी संशोधन संस्था आणि राज्य सरकारच्या 35 संस्थांना अधिकृत केंद्र म्हणून चिन्हीत केले आहे.

कृषी यंत्रसामुग्री प्रशिक्षण आणि चाचणी संस्था बुधनी (मध्य प्रदेश), हिसार (हरियाणा), अनंतपूर (आंध्र प्रदेश), आणि बिस्वनाथ चरैली ( आसाम ) या चार परीक्षण संस्था महत्वपूर्ण भूमिका निभावून देशाच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहेत. यामुळे देशातल्या कृषी क्षेत्रामध्ये क्षमता निर्माण, शेती यंत्रसामुग्रीची चाचणी आणि मूल्यांकन, शेतकऱ्यांसाठी यंत्रांचे प्रदर्शन भरविण्याचे काम करीत आहेत. बुधनी आणि हिसार इथल्या संस्था कृषी टॅक्टरची चाचणी ओईसीडीच्या मानकानुसार केली जाते.

या पोर्टलच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरूषोत्तम रूपाला, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव कैलास चौधरी, संजय अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.