अंदमानात समुद्रमार्गे टाकलेल्या ऑप्टिकल फायबर केबलचे उद्घाटन

समुद्रमार्गे टाकलेल्या 2300 किलोमीटर लांबीच्या ऑप्टिकल फायबर केबलचे आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. पोर्ट ब्लेअर, लिटील अंदमान आणि स्वराज्य बेटांना जोडणारी ही योजना सुरु होणे हा अंदमान-निकोबारच्या नागरिकांसाठी संस्मरणीय दिवस आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

“ या विराट प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे होते, मात्र तरीही ते निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण करण्यात आले, असे गौरवोद्गार शाह यांनी काढले.

यावेळी, पंतप्रधानाचे आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांचे आभार मानत अमित शाह म्हणाले की या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे  अंदमान निकोबार बेटावर विकासाचे एक नवे पर्व सुरु होईल.

अंदमान निकोबार मध्ये आता ऑप्टिकल फायबर केबलमुळे देशातील महानगरांप्रमाणेच जलद गती दूरसंचार सेवा उपलब्ध होतील. ज्यामुळे, ई-शिक्षण, बँकिंग सुविधा, टेलीमेडिसिन अशा सर्व इंटरनेट आधारित सेवा सुरु होतील आणि पर्यटन क्षेत्रात वाढ होऊन रोजगाराला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डिजिटल भारताची निर्मिती आणि नागरिकांना सर्वोत्तम अत्याधुनिक सेवा देण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध आहे, असे गृहमंत्री म्हणाले.