वनामकृविच्या वतीने आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेत अमेरिकेच्या कृषि विभागाचे संचालक मा डॉ पराग चिटणीस यांचे प्रतिपादन
वाढती जागतिक लोकसंख्या, बदलते हवामान, लोकांच्या उत्पन्न व आहारात होत असलेला बदल, ग्राहकांची बदलती गरज या सर्वांचा शेती क्षेत्रावर परिणाम होत आहे. याच पार्श्वभुमीवर योग्य प्रमाणात, शाश्वत, सुरक्षित, पोषक, किफायतशीर तसेच आपल्या समाज व संस्कृतीशी सुसंगत अन्नधान्य उत्पादन तंत्रज्ञानाची गरज आहे. डेटा विज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता याच्या आधारे जागतिक कृषि उद्योगात मोठी क्रांती होणार असुन शेतीशी संबंधीत आकडेवारीचे विश्लेषण करणारे डेटा विज्ञानाबाबत जागृकता करण्याची गरज आहे. याच आधारे शेतकरी शेतीत जास्तीत जास्त उत्पादन व उत्पन्न काढु शकतील, अशी आशा अमेरिकेच्या कृषि विभागाचे संचालक मा डॉ पराग चिटणीस यांनी व्यक्त केली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषद पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलंस, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) आणि आयएसए व आयएसजीपीबी शाखा परभणी वतीने ‘डिजीटल तंत्रज्ञानाव्दारे स्मार्ट शेती–भविष्यात्मक योजना’ यावर ऑनलाईन आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक १० ते १३ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले असुन परिषदेच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रा जयशंकर तेलंगाणा राज्य कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ व्ही प्रविणराव, भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ प्रभात कुमार, अमेरिकेतील ऑरल रोर्बोट युनिवर्सीटीतील तज्ञ डॉ पावेल नवीटक्सी, अर्जेटीना येथील रोसारीओ राष्ट्रीय विद्यापीठाचे प्राध्यापक तज्ञ डॉ जेसल क्रिस्टोफर, अल्गेरीया येथील फरहात अब्बास विद्यापीठाचे प्राध्यापक तज्ञ डॉ लाबाड रायमा, मुख्य आयोजक शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, नाहेप प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा डॉ पराग चिटणीस पुढे म्हणाले की, डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ताने बुद्धिमान निर्णय समर्थन प्रणाली कृषि क्षेत्रात विकसित करणे शक्य आहे. हे सर्व तंत्रज्ञान शेतकरी बांधवाना समजेल अश्या भाषेत उपलब्ध करावे लागेल. आज अमेरिकेतील शेती क्षेत्रात मोठे बदल होत असुन मोठया प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. नागरी भागात शेती व व्हर्टिकल शेती पध्दती विकसित झाली आहे. अद्यायवत डिजिटल तंत्रज्ञान व रोबोटच्या माध्यमातुन काटेकोर सिंचन पध्दती विकसित केली असुन अमेरिकेतील शेतीतील रानडुकरांमुळे होणारे पिकांचे नुकसान मोठया प्रमाणात कमी झाले आहे.
अमेरिकेतील शेतीचा अद्यायवत तंत्रज्ञानामुळे कमी निविष्ठांमध्ये मोठया प्रमाणात उत्पादन वाढ झाली. स्वयंचलित यंत्रे, रोबोट, सेंन्सर तंत्रज्ञान, ड्रोन्स, ट्रॅक्टर आधारीत यांत्रिकीकरण आदीच्या मोठा वापर होतो. सेन्सारच्या सहाय्याने पिकांतील पाण्याचा वापर मोजुन योग्य सिंचन दिले जाते. यंत्रमानवाचा मोठया प्रमाणात शेतीत पिक व्यवस्थापनात वापर करून काटेकोर पध्दतीने शेती केली जाते. अमेरिकेतील कृषि शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांमधील डिजिटल साक्षरतेवर भर दिला जात आहे, असेही ते म्हणाले.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ व्ही प्रविणराव म्हणाले की, भारतातील लहान शेतकरी बांधवाना किफायतीशीर व सुसंगत डिजिटल तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. डिजिटल तंत्रज्ञान विकासाकरिता कृषि क्षेत्रातील विश्वासार्ह आकडेवारी अत्यंत गरजेची असुन शासन, कृषि विभाग व कृषि विद्यापीठ, कृषिशी निगडीत सर्व घटकांना एकत्रित प्रयत्न करावा लागेल.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, भारत आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला आहे, दुध, फळ, भाजीपाला आदी शेती उत्पादनात जगात पहिल्या किंवा दुस-या क्रमांकावर आहे, याचे श्रेय निश्चितच शेतकरी बांधव, राजकीय व तांत्रिक नेतृत्वास जाते. भारतात विविध भागातील शेती, हवामान, पिक पध्दती, शेती पुरक व्यवसाय आदीमध्ये मोठी विविधता आहे.
हवामान बदल, पाणी व मातीची कमी होत जाणारी उत्पादकता, वाढती लोकसंख्या आदी अनेक आव्हाने भारतीय शेती पुढे आहेत. जागतिक स्पर्धेत भारतीय शेतकरी टिकला पाहिजे. याकरिता आपणास डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे स्मार्ट शेती व काटेकोर शेती करावी लागणार आहे. संपुर्ण देशात शेतमाल विपणनासाठी ई-नाम यंत्रणा उभारण्यात आली असुन निश्चितच याचा मोठा लाभ शेतकरी बांधवाना होणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करण्याकरिता लागणारे कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी परभणी कृषि विद्यापीठ प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात डॉ प्रभात कुमार, डॉ पावेल नवीटक्सी, डॉ जेसल क्रिस्टोफर, डॉ लाबाड रायमा यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्य आयोजक शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी केले तर मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ आय ए बी मिर्झा व डॉ सुनिता पवार यांनी केले तर आभार विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी मानले.
चार दिवस चालणा-या या परिषदेत अमेरिका, बेलारूस, लेबनान, अल्गेरीया, अर्जेटीना येथील जागतिकस्तरावरील तज्ञ डिजिटल तंत्रज्ञानाचा माध्यमातुन जागतिक शेती व भारतीय कृषि तंत्रज्ञानाचे भविष्यात्मक उपयोग व योजनात्मक यावर दृष्टीक्षेप टाकणार आहेत. परिषदेत विदेशातील तसेच देशातील विविध राज्यातील कृषि तज्ञ, शास्त्रज्ञ, प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी सहभागासाठी नोंदविला आहे. आयोजन समितीत डॉ जे ई जहागिरदार, डॉ भगवान आसेवार, डॉ एच व्ही काळपांडे, डॉ आर व्ही चव्हाण, डॉ आय ए बी मिर्झा, डॉ एस व्ही कल्याणकर, डॉ जे डी देशमुख, डॉ पी के वाघमारे आदीचा सहभाग असुन तांत्रिक सहाय्य नाहेप टीम सदस्य इं खेमचंद कापगाते, डॉ अविनाश काकडे, डॉ रश्मी बंगाळे, इं रहीम खान, इं ताझीम खान , इं शैलेश शिंदे आदींचे आहे.