Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

बीबीएफ व फवारणी यंत्रास शेतकरी बांधवाची पसंती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ऑगस्ट रोजी मौजे जांंब शिवारामध्ये विद्यापीठ विकसित ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्र तसेच बैलचलीत सौर ऊर्जेवरील फवारणी यंत्र यांचे प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू मा श्री अशोक ढवण यांच्‍या विशेष उपस्थिती करण्‍यात आले होते.

प्रात्‍यक्षिक पाहण्‍याकरिता मौजे पारवा, सोन्ना व मौजे जांंब या शिवारातील शेतकरी उपस्थित होते. सदरिल विद्यापीठ विकसित ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्र व बैलचलीत सौरऊर्जेवरील फवारणी यंत्र बाबत शेतक-यामध्‍ये मोठी उत्‍सुकता असल्‍याचे लक्षात आले.

विद्यापीठ विकसित ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्र तसेच बैलचलीत सौर ऊर्जेवरील फवारणी यंत्र यांचे प्रात्यक्षिक डॉ स्मिता सोलंकी यांनी दाखवुन सखोल मार्गदर्शन केले तसेच शेतक-यांना भेडसवणा-या यांत्रिकीकरणातील समस्‍याचे समाधान केले. मार्गदर्शनात डॉ स्मिता सोलंकी म्‍हणाल्‍या की, अनेक शेतकरी बांधवाकडे ट्रॅक्‍टर उपलब्‍ध आहेत, परंतु त्‍याचा पुर्णक्षमतेने वापर होतांना दिसत नाही.

केवळ पिकांच्‍या पेरणी पुरते त्‍याचा वापर मर्यादित आहे, परंतु विद्यापीठ विकसित बहुउद्देशीय बीबीएफ यंत्रामुळे पेरणी, रासणी, कोळपणी, तणनाशक व किटकनाशक फवारणी आदी कामे ट्रॅक्‍टरने शक्‍य आहे. ट्रॅक्‍टर ला कमी रूंदीचे टायरचा वापर केल्‍यास उभ्‍या पिकांमध्‍ये कोळपणी व फवारणी शक्‍य होते. हेच सिध्‍द करण्‍याकरिता विद्यापीठ शेतक-यांच्‍या शेतावर प्रात्‍यक्षिके करून दाखवित असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

यावर्षी परभणी जिल्‍हयातील विविध गावांतील ४५ निवडक शेतकरी बांधवाच्‍या १२५ एकर क्षेत्रावर कृषि विभागाच्‍या सहकार्याने विद्यापीठ विकसित बीबीए पेरणी यंत्राव्‍दारे सोयाबीन लागवड करण्‍यात आली.

Exit mobile version