अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही

मुंबई, दि. १३ : राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शक्य नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत राज्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव आणि अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी निर्णय जाहीर केला. श्री. सामंत म्हणाले, परीक्षा घेऊच नये अशी शासनाची भूमिका नाही. तर राज्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता अशा परिस्थितीत आत्ता परीक्षा घेणे योग्य होणार नाही ही शासनाची भूमिका आहे.

सर्व १३ अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी या परिस्थितीत परीक्षा घेणे उचित होणार नाही हे शासनाला लेखी कळवले आहे. त्याचबरोबर पालक आणि शिक्षक यांचा देखील लगेच परीक्षा घेण्यास विरोध आहे. त्यामुळे अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षा आत्ता लगेच घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. युजीसी जर मार्गदर्शक तत्वे आम्हाला देते तर जबाबदारीही घेणार काय? असा प्रश्नही श्री. सामंत यांनी यावेळी उपस्थित केला.

ज्यांची इच्छा आहे ते देऊ शकतील परीक्षा

विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून त्यांना योग्य ते सूत्र वापरून त्यांचा निकाल घोषित करावा आणि पुढे कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परिस्थिती सुधारल्यावर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला गुण कमी मिळाले आहेत असे वाटते त्यांना परीक्षेची संधी देण्यात येईल.

मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील/वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल घोषित करावा.

आणि मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम सत्रातील/वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यात यावी.

अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोणत्या महिन्यात घेता येऊ शकतील, याची कोविड – १९ चा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन, तसेच संबंधित जिल्हाधिकारी तथा आपत्ती निवारण प्राधिकरण यांचेशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी निर्णय घ्यावा व त्यानुसार वेळापत्रक जाहीर करावे. अशा सूचना सुद्धा विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.