केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेल्या निर्देशांनुसार,पिकांवरील टोळधाड आक्रमण रोखण्यासाठी सातत्याने उपाययोजना सुरु आहेत. 11 एप्रिलपासून सुरु झालेल्या या उपाययोजना 9 जुलैपर्यंत सुरूच आहेत. या काळात, महाराष्ट्रासह छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि बिहार राज्यातल्या एकूण 1,51,269 हेक्टर परिसरात टोळधाड नियंत्रण करण्यात आले. 9 जुलैपर्यंत महाराष्ट्र आणि इतर राज्य सरकारांनी 1,32,660 हेक्टर जमिनीवर उपाययोजना केल्या आहेत.
सध्या, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि , उत्तरप्रदेश या राज्यात 60 नियंत्रण पथके कार्यरत आहेत.त्याशिवाय केंद्र सरकारचे 200 कर्मचारी या कामातव्यस्त असून, आता आणखी 20 फवारणी यंत्रे पाठवण्यात आली आहेत.
तसेच 55 अतिरिक्त वाहनेही देण्यात आली आहेत.
राजस्थानमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बेल हेलीकॉप्टरच्या मदतीने टोळधाड रोधक औषधाची हवाई फवारणी केली जात आहेत.
या टोळधाडीमुळे महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश ,छत्तिसगढ, बिहार आणि हरियाणा या राज्यातील पिकांचे फार नुकसान झाल्याची नोंद झाली.
अन्न आणि कृषी संस्थांनी 3 जुलै 2020 रोजी दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाचे आगमन होण्यापूर्वी,अनेक टोळधाड किडे भारत-पाकिस्तान सीमेच्या दिशेने उडून गेले आहेत, मात्र भारताच्या उत्तरेकडील काही राज्यात आणि नेपाळमध्ये अद्याप टोळधाडीचे अस्तित्व दिसते आहे.ही टोळधाड पुन्हा एकदा राजस्थानात जुलै मध्यम दरम्यान येण्याची शक्यता आहे.