प्रत्येकाने कोरोना योद्धे म्हणून काम करण्याची गरज: डॉ धनंजय केळकर
लहान मोठी सर्व रुग्णालये, आरोग्य केंद्र, नर्सिंग होम यांनी कोरोनाच्या भीतीला बाजूला सारून कोरोना उपचार द्यायला हवेत, असे मत डॉ धनंजय केळकर यांनी आज व्यक्त केले. याशिवाय प्रत्येक व्यक्तीने कोरोना योद्धे म्हणून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र आणि गोवा), तसेच पत्र सूचना कार्यालय, पश्चिम विभाग यांनी आज ‘कोविड-19च्या काळात खासगी रुग्णालयांची भूमिका आणि जबाबदाऱ्या’ या विषयावर एका वेबिनारचे आयोजन केले होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे विश्वस्त व वैद्यकीय संचालक डॉ धनंजय केळकर व याच रुग्णालयाचे कन्सल्टंट इंटेन्सिव्हिस्ट डॉ समीर जोग यांनी वेबिनार मध्ये आपली भूमिका मांडली.
लोकांचा असा समज आहे कि, साथ रोगाची जबाबदारी ही शासनाची आहे, याचे प्रतिबंधात्मक उपाय शासनाने करायला हवेत; ही समजूत कोरोना संदर्भात चूकीची ठरते, कारण जगात या साथ रोगासाठी अजून प्रभावी लस किंवा औषध अस्तित्वात नाही. या रोगाचा प्रसार कमी ठेवणे करता येण्यासारखे आहे, परंतु टाळता येणार नाही; हे सत्य स्वीकारून वाड्या-वस्त्या, गाव, लहान शहरे, महानगरे या सर्व ठिकाणी कोरोना उपलब्ध उपचार दिले जायला हवेत, असे डॉ केळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
अनाठायी भीती कमी करण्याचे काम सर्व वैद्यकीय यंत्रणांनी करावे: डॉ समीर जोग
डॉ समीर जोग यांनी अशास्त्रीय अनाठायी पसरलेली भीती घालविण्याचे काम सर्व वैद्यकीय यंत्रणा, शासकीय विभाग यांनी करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे यावेळी सांगितले. प्रत्येकाला हा आजार होणार नाही, अनेकांना झालेला कळणार देखील नाही, शास्त्रीयदृष्ट्या 80 ते 82 टक्के लोकांना अतिशय सौम्य लक्षणे दिसतात व साधारण स्वरूपाची काळजी घेतल्याने देखील ते यातून बाहेर पडू शकतात, प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर रोग होणे, न होणे अवलंबून असते, अशी माहिती डॉ जोग यांनी अधोरेखित केली. प्रत्येक कोरोनाबाधित व्यक्तीने रुग्णालयात भरती होण्याची, महागड्या मोठ्या चाचण्या करण्याची मुळीच गरज नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
या वेबिनारच्या निमित्ताने दोनही डॉक्टरांनी समाज माध्यमातून फिरणाऱ्या अनेक अफवांचे खंडन केले; कोरोनाच्या निमित्ताने अवयव काढून घेणे, अधिक शुल्क आकारणे, कोरोना झालेला नसताना खोटे अहवाल देणे, अशा आरोपांचे निराकरण यावेळी त्यांनी केले.
या वेबिनारचे प्रास्ताविक प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र आणि गोवा) चे संयुक्त निदेशक संतोष अजमेरा यांनी केले. क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, औरंगाबादचे सह संचालक निखिल देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आभारप्रदर्शन प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र आणि गोवा) चे व्यवस्थापक डॉ जितेंद्र पानपाटील यांनी केले.