अद्ययावत उपकरणे व तंत्रज्ञानावर आधारित हवामान अंदाज व सतर्कता सेवांचे प्रमाण सुधारण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने अलिकडच्या वर्षांत विविध उपक्रम राबविले आहेत. उपक्रमांची हीच श्रुंखला पुढे सुरु ठेवत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने भारतीय हवामान विभागासाठी “मौसम” हे मोबाइल अॅप सुरू करण्याचे गौरवपूर्ण कार्य केले आहे.
हे मोबाइल अॅप प्लेस्टोअर आणि अॅपस्टोर या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.
तांत्रिक कार्यकुशलतेशिवाय हवामानाची माहिती आणि पूर्वानुमान एका आकर्षक पद्धतीने एकत्रित करण्यासाठी डिझाइन केलेले हे मोबाइल अॅप सर्वसामान्यांना हाताळण्यास सोपे आहे.
वापरकर्ते हवामान, हवामान अंदाज, रडार प्रतिमा यांचा वापरू शकतात आणि त्यांना हवामानाच्या घडामोडींसंदर्भात सतर्कतेचा इशारा मिळू शकतो
मौसम मोबाइल अॅपवर खालील 5 सेवा उपलब्ध आहेतः
- वर्तमान हवामान – 200 शहरांसाठी दिवसातून 8 वेळा वर्तमान तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा याबद्दलची सुधारित माहिती देण्यात आली आहे. सूर्योदय / सूर्यास्त आणि चंद्रोदय / चंद्रास्त याविषयीची माहिती देखील दिली आहे.
- नाऊकस्ट – आयएमडीच्या राज्य हवामान केंद्राद्वारे सुमारे 800 स्थानके आणि भारतातील जिल्ह्यांसाठी स्थानिक हवामानातील घटनेविषयी आणि त्यांच्या तीव्रतेबद्दल तीन-तीन तासांनी इशारा. तीव्र हवामानाच्या बाबतीत, त्याचा परिणाम देखील इशारामध्ये समाविष्ट केला आहे.
- शहरासाठीचा अंदाज – भारतातील सुमारे 450 शहरांमध्ये मागील 24 तास आणि 7 दिवसांचा हवामानाचा अंदाज.
- इशारा – नागरिकांना धोकादायक हवामानाबद्दल इशारा देण्यासाठी येत्या पाच दिवसांसाठी सर्व जिल्ह्यांना दिवसातून दोनदा कलर कोडमध्ये (लाल, नारिंगी व पिवळे) इशारा दिला जाऊ शकतो. लाल रंगाचा कोड हा गंभीर परिस्थितीसाठी असून अधिकाऱ्यांना येणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आणि कारवाई करण्याची विनंती करते, नारिंगी रंग अधिकारी व जनतेला जागरुक राहण्यास सांगतो तर पिवळ्या रंगाचा कोड अधिकारी व जनतेला स्वतःला अद्ययावत ठेवण्यास प्रवृत्त करते.
रडार उत्पादने : दर 10 मिनिटांनी नवीनतम स्टेशनद्वारे रडार माहिती अद्ययावत केली जाते.
मौसम मोबाइल अॅप हे हवामानाची माहिती आणि इशारा आकर्षक आणि वापरकर्ता अनुकूल पद्धतीने प्रसारित करणारे महत्त्वपूर्ण साधन असेल जे जनतेच्या गरजा पूर्ण करेल.
ICRISAT ची डिजिटल कृषी व युवा (डीएई) टीम, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (आयआयटीएम), पुणे आणि भारत हवामानशास्त्र विभाग यांनी संयुक्तपणे या मोबाइल अॅपची रचना केली आहे.