पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पूर परिस्थितीबाबत सूचना

पावसाचा अंदाज लक्षात घेऊन त्यानुसार केंद्रीय जल आयोगाने  विविध राज्यांना  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत-

गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा –

निम्न माही,निम्न नर्मदा, निम्न तापी आणि दमणगंगा खोऱ्यात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 4-5 दिवसात पावसाची शक्यता लक्षात घेऊन नर्मदा, तापी आणि दमणगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचा व्यक्त केलेला अंदाज लक्षात घेता वलसाड जिल्ह्यातल्या मधुबन धरणात पाण्याचा प्रचंड ओघ येण्याची शक्यता आहे. सध्या हे धरण 67.09%.भरले आहे. यासंदर्भात परिस्थितीवर लक्ष ठेण्यात येत असून धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग करावा लागल्यास दमण या केंद्र शासित प्रदेशासह संबंधित जिल्ह्यांना त्याची आधी सूचना देऊन आणि योग्य ती काळजी घेऊनच हा विसर्ग केला जाईल.

या भागातली माही नदीवरचे कडाना धरण,पानाम नदीवरचे पानाम धरण,नर्मदा नदीवरचे सरदार सरोवर धरण, तापी नदीवरचे उकाई धरण यासारखी इतर धरणेही मोठ्या प्रमाणात भरण्याची  शक्यता आहे.महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातल्या  हतनूर धरणात आज रात्री पर्यंत  1505 क्युमेक पाणी तर उकाई धरणात उद्या सकाळ पर्यंत 3703 क्युमेक पाणी येण्याची शक्यता आहे. त्यांच्या पाणलोट क्षेत्रात अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने अचानक पाण्याचा लोंढा वाढण्याची शक्यता आहे. याचे मानक संचालन पद्धतीनुसार आणि नियमानुसार संबंधीत सर्व जिल्ह्यांना योग्य  वेळेत सूचना देऊन नियमन  करावे.

किमान 1-2 दिवस  अतिशय मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता असल्याने गोवा आणि  महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर तापी आणि ताद्री दरम्यानच्या पश्चिमेला वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. या भागातले रस्ते आणि रेल्वे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने आवश्यक खबरदारी घेण्यात यावी. दुर्घटना टाळण्यासाठी रस्ते आणि रेल्वे वाहतूक नियंत्रित करण्याबाबतही काळजी घेण्यात यावी.