Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

केंद्र शासनाकडून मका खरेदीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मुंबई,दि २२ जुलै :– केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीस ३१ जुलैपर्यंत २५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यास मुदतवाढ दिली असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

या वर्षी पीक पद्धतीतील बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर मक्याचे पीक घेतले गेल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मका खरेदीस प्रथम १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु अजून ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मका शिल्लक असल्याने मका खरेदीची खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी होती. मका खरेदीस मुदतवाढ देण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडे केली होती. तसेच श्री. भुजबळ यांनी केंद्र शासनाकडे संपर्क साधून राज्य शासनाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती केली होती.

त्यानुसार केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला ‘ मका खरेदीस ३१ जुलैपर्यंत २५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यास मुदतवाढ दिली आहे. केंद्राने राज्याचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी केली जाणार असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Exit mobile version