खरीप हंगामात महाराष्ट्रात युरियाची टंचाई नाही

खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला 1 एप्रिल ते 16 जुलै याकाळात 8.83 लाख मेट्रिक टनाची आवश्यकता असताना 11.96 लाख मेट्रिक टन युरिया उपलब्ध करून देण्यात आला

केंद्र सरकारचा खत विभाग देशातील सर्व राज्यांना वेळेवर आणि पुरेसा खत पुरवठा सुनिश्चित करतो. राज्यांनी पेरणीपूर्वी दिलेल्या अंदाजित आवश्यकतेनुसार खतपुरवठा केला जातो.

महाराष्ट्रासाठी पूर्ण खरीप हंगामासाठी (1 एप्रिल ते 20 सप्टेंबर) 15 लाख मेट्रिक टन युरियाची आवश्यकता वर्तवण्यात आली होती. पुरवठादारांनी मान्य केलेल्या पुरवठा आराखड्यानुसार पुरवठा करावा अशा सूचना देण्यात आल्या असून त्यावर खत विभागाकडून दैनंदिन देखरेखही ठेवण्यात येत आहे. आवश्यकतेत वाढ झाल्यास हा विभाग योग्य ती पावले उचलत आहे.

1 एप्रिल ते 16 जुलै या काळात 8.83 लाख मेट्रिक टनाची आवश्यकता असताना 11.96 लाख मेट्रिक टन युरिया उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये सुरवातीच्या 4.02 लाख मेट्रिक टन साठ्याचा समावेश आहे.

या काळात थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून 9.57 लाख मेट्रिक टन युरियाची विक्री झाली. गेल्या वर्षी याच काळात ही विक्री 4.70 लाख एमटी होती.  या हंगामात अभूतपूर्व उच्च विक्री नंतरही  युरियाची उपलब्धता पुरेशी राहिली.

सध्या सुरु असलेल्या जुलै महिन्यात अंदाजित आवश्यकता 3.15 लाख मेट्रिक टन असताना खत विभागाने 4.34 लाख मेट्रिक टन ( सुरवातीच्या 2.70 एलएमटी साठ्यासह ) उपलब्धता सुनिश्चित केली आहे. 16 जुलै 2020 रोजीचा 2.38 लाख मेट्रिक टनाचा क्लोजिंग स्टॉक चालू महिन्याची 1.52 लाख मेट्रिक टनची अंदाजित आवश्यकता भागवण्यासाठी पुरेसा आहे. तसेच मान्यताप्राप्त पुरवठा योजनेनुसार युरियाचा पुरवठा सुरू आहे.