महाराष्ट्रातील सहा खेळाडुंना अर्जुन पुरस्कार प्रदान

 राज्याला एकूण १४ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

नवी दिल्ली, दि. २९ : घोडेस्वार सुभेदार अजय सावंतनौकानयनपटू दत्तू भोकनाळकुस्तीपटू राहूल आवारे, पॅरा स्वीमर सुयश जाधव, खोखोपटू सारिका काळे आणि टेबलटेनिसपटू मधुरिका पाटकर यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून  अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्रातील 14 व्यक्ती व संस्थाना आज वर्ष 2020 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात सहा अर्जुन पुरस्कार, तीन ध्यानचंद पुरस्कार, एक द्रोणाचार्य पुरस्कार, एक तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी  पुरस्कार आणि तीन संस्थाना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्यप्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार- 2020’ चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती तर विज्ञान भवनातून केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते. यावेळी देशाच्या विविध भागातून सहभागी क्रीडापटू, क्रीडा प्रशिक्षक आणि संस्थाना गौरविण्यात आले महाराष्ट्रातील 14 व्यक्ती व संस्थाना यावेळी गौरविण्यात आले .

राज्यातील सहा खेळाडुंचा अर्जुन पुरस्काराने सन्मान

सुभेदार अजय अनंत सावंत यांना घोडेस्वारीतील योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुभेदार सावंत यांनी 2016 मध्ये इजिप्त येथे आयोजित टेंट पिगींग, सोर्ड पिगींग आणि लान्स टेंट पिंगींग या घोडेस्वारी प्रकारात भारत देशाला सुवर्ण पद‍क मिळवून दिले. तसेच, अबुधाबी येथे 2018 मध्ये आयोजित विश्व चषक स्पर्धेत टेंट पिगींगमध्ये रजत पदक पटकावून त्यांनी देशाचा गौरव वाढविला आहे .

नौकानयनपटू दत्तू बबन भोकनाळ यांना उत्कृष्ट योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. 2016 मध्ये आयोजित रियो ऑलम्पिक स्पर्धेत एकल नौकानयन प्रकारात त्यांनी 13 वे स्थान प्राप्त केले होते, हा कीर्तीमान करणारे श्री. भोकनाळ हे पहिले भारतीय ठरले. एशियन गेम 2018 आणि एशियन चँम्पियनशिप 2015 मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

कुस्तीपटू राहुल आवारे यांना कुस्तीतील उल्लेखनीय योगदानासाठी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील उत्कृष्ट पहेलवानांमध्ये समावेश असलेल्या राहुल आवारे यांनी 2018 मध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकाविले.  2019 मध्ये आयोजित जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक, सिनियर एशियन चँम्पियनशिप 2019 आणि 2020 मध्ये कास्य पदक मिळवून देशाचा बहुमान वाढविला आहे.

पॅरा स्वीमर सुयश नारायाण जाधव यांना जलतरणातील उत्कृष्ट योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2018 मध्ये आयोजित एशियन पॅरा क्रीडा स्पर्धेत बटर फ्लाय (50 मीटर) प्रकारात सुवर्ण पदक, फ्रिस्टाईल (50 मीटर) प्रकारात कांस्य पदक आणि इंडिव्हिज्वल मेडले (200 मीटर) प्रकारात कांस्य पदक पटकाविले.

खोखोपटू सारिका काळे यांना उल्लेखनीय योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.  2016 मध्ये आयोजित दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि 2018 मध्ये इंग्लड येथे आयोजित जागतिक खोखो स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे. 52 व्या सिनियर नॅशनल चँम्पियनशिप स्पर्धेमध्येही त्यांनी सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे.

टेबलटेनिसपटू मधुरिका सुहास पाटकर यांना उत्कृष्ट योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2018 मध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांघिक खेळात सुवर्ण पदक. 2019 मध्ये आयोजित राष्ट्रकुल चँम्पियनशिप स्पर्धेत सांघिक खेळात सुवर्ण पदक आणि एकल स्पर्धेत रजत पदक पटकावून भारत देशाला बहुमान मिळवून दिला आहे.

प्रदीप गंधे, तृप्ती मुरगुंडे आणि सत्यप्रकाश तिवारी यांचा ध्यानचंद पुरस्काराने गौरव

प्रदीप गंधे यांना उल्लेखनीय योगदानासाठी ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले. 1982 मध्ये आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेत दुहेरी आणि एकेरी स्पर्धेत कांस्य पदक पटकाविली. ऑस्ट्रेलियन ओपन आणि जागतिक  बॅडमिंटन चँम्पियनशिप तसेच नॅशन बॅडमिंटन चँम्पियनशिप मध्येही जेतेपदाचा मान मिळविला आहे. बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतल्यानंतर श्री. गंधे यांनी अनेक बॅडमिंटनपटूंना प्रशिक्षण दिले आहे.

तृप्ती  मुरगुंडे यांना उत्कृष्ट कार्यासाठी ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2006 मध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले. 2002 आणि 2006 तसेच 2010 मध्ये आयोजित सॅप गेममध्ये त्यांनी एकूण 5 सुवर्ण पदकांवर नाव कोरले.  2018 मध्ये आयोजित थॉमस उबेर चषकमध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी देशाला मिळवून दिलेला गौरव आणि बॅडमिंटन खेळाच्या प्रसारासातील योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रसिध्द पॅरा बॅडमिंटनपटू सत्यप्रकाश तिवारी यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले. पॅसिफीक गेम, विश्व चषक बॅडमिंटन स्पर्धा, आयडब्ल्युएएस जागतिक स्पर्धा आणि आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी पदक मिळविली आहेत. निवृत्तीनंतर श्री तिवारी हे युवा खेळाडुंना प्रशिक्षण देत आहेत.

विजय बी मुनिश्वर यांना द्रोणाचार्य पुरस्कार

पॅरा पावर लिफ्टींग प्रशिक्षक विजय मुनिश्वर यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री मुनिश्वर यांनी अनेक पॅरा खेडाळूंना प्रशिक्षीत केले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या खेळाडुंनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला गौरव मिळवून दिला.त्यांच्या शिष्यांमध्ये राजेंद्रसिंह रहेलु, फर्मान बाशा , सचिन चौधरी आदींचा समावेश आहे. नागपूर येथील श्री मुनिश्वर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि दादोजी कोंडदेव पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

गिर्यारोहक केवल कक्काला भूसाहसासाठी तेनसिंग नॉर्गे पुरस्कार  

 जगातील सर्वात उंच असे एव्हरेस्ट आणि लाओत्से शिखर केवळ सहा दिवसात सर करण्याची किमया करत हा बहुमान मिळविणारा पहिला भारतीय ठरण्याचा बहुमान मिळविणाऱ्या मुंबई येथील गिर्यारोहक केवल हिरेन कक्का याला भूसाहस क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 राज्यातील तीन संस्थाना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

पुणे येथील आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूटला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला, कर्नल राकेश यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मिशन ऑलम्पिक कार्यक्रमांतर्गत 2001 मध्ये स्थापन झालेली ही  संस्था  देशात आपल्या क्षेत्रातील नामांकित संस्था आहे. या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या अनेक खेळाडुंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. यात तरूणदीप राय (धनुर्विद्या)  आणि ॲथलेटिक्समध्ये नीरज चोपडा, अरोक्य राजीव, जीनसन जॉन्सन यांचा समावेश आहे.

पुणे येथीलच लक्ष्य इन्स्टिट्यूटला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आाला, संस्थेचे अध्यक्ष विशाल चौरडिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला. लक्ष्य इन्स्टिट्यूचे खेळांच्या संरक्षण आणि संवर्धनात मोलाचे योगदान राहिले आहे. या संस्थेने पुणे येथील ‘गन फॉर ग्लोरी’ या शुटींग अकादमी आणि भिवानी येथील हवासिंग बॉक्सिंग अकादमीच्या स्थापनेसाठी आरंभिक आर्थिक मदतीसह वेळोवेळी  मदत केली आहे. या उभय संस्थांतील खेळाडुंनी ऑलम्पिक स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. राही सरनोबत, अश्विनी पुनप्पा, ज्वाला गुट्टा, री दि ज्यू या खेळाडूंचा यात समावेश आहे.

मुंबई येथील इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्पोर्ट मॅनेजमेंट (आयआयएसएम)ला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्काराने गौरविण्यात आले, संस्थेचे संस्थापक  संचालक निलेश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. क्रीडा क्षेत्रात संशोधन करणारी ही देशातील पहीली व्यावसायिक व्यवस्थापन संस्था आहे. या संस्थेने 1500 हून अधिक व्यावसायिक लोकांना प्रशिक्षत  केले असून ते देशाच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका वठवित आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने ही संस्था पदवी आणि पदवीका शिक्षणही देत आहे. या कार्यक्रमास दिल्ली, मुंबई,पुणे, बेंग्लुरू, कोलकोत्ता, चंदिगढ, सोनिपत, इटानगर, भोपाल, लखनऊ आणि हैद्राबाद येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे  क्रीडापटू , क्रीडा प्रशिक्षक आणि संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.