कामधेनु चेअर उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये गाईंच्या वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्वाबाबत सजगता वाढवेल- डॉ. कथिरीया, अध्यक्ष, राष्ट्रीय कामधेनू आयोग
राष्ट्रीय कामधेनू आयोगाने विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषद (AICTE) आणि भारतीय विद्यापीठ संघ (AIU) यांच्या संयुक्त विद्यमाने, भारतातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांत कामधेनू चेअरची स्थापना करण्यासाठी राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते. राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरीया यांनी ही संकल्पना पुढे मांडली आणि देशातील सर्व कुलगुरू आणि महाविद्यालयांच्या प्रमुखांना कामधेनु चेअर उपक्रम सुरू करण्याचे आवाहन केले. डॉ.कथिरीया म्हणाले, की आपल्या स्वदेशी गाईंचे कृषी, आरोग्य, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्व आपल्या युवावर्गाला शिकविण्याची आवश्यकता आहे. आता सरकारने गाई आणि पंचगव्यातील सुप्त गुण ओळखायला आरंभ केला आहे. स्वदेशी गाईंसंदर्भातील वैज्ञानिक माहिती करून देण्याची गरज आहे आणि आपल्या शैक्षणिक पध्दतीत त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हायला हवे, तसेच आधुनिक, वैज्ञानिक आणि प्रक्रियाभिमुख दृष्टीकोनातून या गाईंमुळे मिळणाऱ्या लाभांबाबतच्या संशोधनाला चालना मिळायला हवी.
शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी या कामधेनु चेअर उपक्रमाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, आपल्याला गाईंपासून मिळणाऱ्या लाभांमुळे आपला समाज संपन्न झाला होता परंतु परदेशी राज्यकर्त्यांच्या प्रभावामुळे आपण त्या बद्दल विसरून गेलो होतो. ते म्हणाले, आमचा या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा आहे. मला विश्वास आहे, की प्रथम काही महाविद्यालये आणि विद्यापीठे कामधेनु चेअर उपक्रमाची सुरुवात करतील आणि त्यानंतर इतर त्याचे अनुकरण करतील. संशोधन आणि व्यावहारिकदृष्ट्या अंमलात आणण्यासाठी या उत्पादनांचे प्रदर्शन करायला हवे ,आर्थिक घडी बसविण्याच्या दृष्टीने आणि अचूक वैज्ञानिक माहिती सुयोग्य वेळात उपलब्ध करता आली पाहिजे. संजय धोत्रे यांनी डॉ. वल्लभभाई कथिरीया यांनी या उपक्रमासाठी केलेल्या ऐतिहासिक प्रयत्नांचे आणि नेतृत्वाचे यावेळी कौतुक केले.