आयकर विभागाने मुंबईतील प्रमुख बांधकाम व्यावसायिक आणि विकासक समूह प्रकरणी 17.03.2021 रोजी छापे घातले. मोबाईल अॅक्सेसरीजच्या व्यापारात सहभागी असलेल्या डीलर्सच्या प्रकरणीही छापे टाकण्यात आले. मुंबईत एकूण 29 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली, तर 14 ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले.
बांधकाम क्षेत्रातील हा समूह एक व्यावसायिक मॉल विकसित करत आहे, ज्यामध्ये केवळ मोबाइल उपकरणाच्या व्यवसायासाठी 950 गाळे आहेत. त्यापैकी 2017 पासून आतापर्यंत सुमारे 905 गाळ्यांची विक्री झाली आहे. छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणी सापडलेल्या पेन ड्राईव्हमध्ये स्टोअर पुराव्यांवरून या समूहाने कराराच्या मूल्यापेक्षा 150 कोटी रुपये जास्तीचे घेतले असून त्याचा हिशेब अशा गाळ्यांच्या विक्रीसंबंधी लेखा पुस्तकात दिलेला नाही. तसेच याच प्रकारचा 70 कोटी रुपये स्वीकारल्याचा पुरावा निवासी-कम व्यावसायिक प्रकल्पाशी संबंधित पेन ड्राईव्हमध्ये सापडला आहे. या बांधकाम व्यावसायिकाने विविध प्रकल्पांमध्ये दुकाने/ फ्लॅट्स यांची विक्री करून घेतलेल्या रक्कमेच्या डिजिटल पावत्या देखील जप्त करण्यात आल्या.
मोबाईल साहित्याच्या व्यवसायात सहभाग असलेल्या डीलर्स संदर्भात, अनियमित विक्रीसंबंधित विविध गुन्हेगारी स्वरूपाचे पुरावे सापडले आहेत. हा समूह चीनमधून वस्तूंची आयात करतो आणि हा माल पूर्ण देशभर विकतो. आयात केलेल्या वस्तूंची पावती असते आणि पैसे देताना हवाला मार्गे दिले जातात. बेहिशेबी साठा असलेली 13 गुप्त गोदामे सापडली आहेत, त्यातील साठा मोजण्यात येत असून त्याचे मूल्यांकन सुरु आहे.
तसेच या डीलर्सनी मालमत्तांमध्ये 40.5 कोटीं रुपयांची बेहिशेबी गुंतवणूक केल्याचा पुरावा हाती लागला आहे. यापैकी 21 कोटींची बेहिशेबी गुंतवणूक. व्यावसायिक मॉलमधील गाळे खरेदीसाठी आहे. कर्मचार्यांच्या नावे असलेली चार अघोषित बँक खातीही सापडली आहेत, ज्याचा वापर समूहाच्या किरकोळ विक्रेत्यांकडून विक्रीतून मिळणारी रक्कम जमा करण्यासाठी केला जात होता. बँक खात्यात एकूण जमा रक्कम 80 कोटी रुपये इतकी आहे.
या कारवाईत असे दिसून आले आहे की मोबाईल अॅक्सेसरीजच्या व्यापाराचे संपूर्ण क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी आहे. मुख्य घटक चीन मधून मुंबई व चेन्नई बंदरामध्ये आयात केले जातात. शोध मोहिमेत असे उघड झाले आहे की डीलर्स प्रामुख्याने विक्री आणि खरेदी कमी दाखवत आहेत. चिनी लोकांसोबतचे व्यवहार वुई-चॅट अॅपद्वारे होतात. विभागाने फॉरेन्सिकचा वापर करून वुई-चॅट मेसेजेस परत मिळवले आहेत. चीनी आयातीचे प्रमाण व मूल्य या संदर्भातील माहितीची पडताळणी केली जात आहे.
5.89 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम या कारवाईत जप्त केली आहे. या शोधकार्यादरम्यान 270 कोटींच्या अघोषित उत्पन्नाचा शोध लागला आहे. पुढील तपास आणि बेहिशेबी स्टॉकचे मूल्यांकन करण्याचे काम चालू आहे.