द्राक्ष पंढरीच्या व्यथा

दीपक श्रीवास्तव

शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा, बळीराजा, शेतकरी जगला तर देश जगेल, अशा वेगवेगळ्या घोषणा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सर्वजण देत असतात. परंतु प्रत्यक्षातील चित्र हे अगदी उलट असल्याचे पाहायला मिळते.

कृषी पंढरीची गोष्ट बघायची तर निफाड तालुका हा कृषिप्रधान असल्याने तालुक्यातील किमान 90 टक्के लोक शेतीशी निगडित आहेत. शेतीत चांगला पैसा मिळाला तर निफाड तालुका निश्चितच आबादीआबाद राहील, परंतु शेतकर्‍यांचे मरण हेच आमचे धोरण असेच एक नवे समीकरण सध्या तालुक्यात रूढ होऊ लागले आहे. शेतकऱ्यांना नुकसानीत आणून शेती संपवण्यासाठी ही एक चालच आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे .

निफाड तालुक्यातील सर्वात मोठे नगदी पीक म्हणजे द्राक्ष वर्षभर मेहनत केल्यानंतर द्राक्ष पिक शेतकऱ्याच्या हाती येते. भरपूर कष्ट करून आणि वारेमाप भांडवल घालून तयार केलेली द्राक्षे जेव्हा बाजारात विक्रीसाठी पाठवायची वेळ येते तेव्हा अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला संपविण्यासाठी जणू सारेच गिधाडे सारखे तुटून पडतात.

या लुटमारीची सुरुवात होते द्राक्ष तयार झाल्यानंतर व्यापारी शोधण्यापासून. चांगला व्यापारी मिळणे आणि त्याने फसवणूक न करता चांगला भाव मिळवून देणे ही गोष्ट अगदी नशीबवान शेतकऱ्यालाच बघायला मिळू शकते. बहुतेक शेतकरी हे दलालांच्या भरोशावर आपले व्यवहार करतात. शेतकर्यांकडून दोन ते तीन टक्के दलाली घेणारे हे दलाल शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन तुम्हाला चांगला भाव मिळवून देतो अशी लालच दाखवतात दुसरीकडे परप्रांतीय ज्यांची कोणाशी काही ओळख नसलेले तथाकथित व्यापारी या दलालांना जास्त कमिशन देण्याची लालूच दाखवून शेतकर्‍यांकडून माल घेतात प्रत्यक्ष माल काढणीच्या वेळेस प्रारंभी चांगला चांगला माल काढून घ्यायचा आणि नंतर मात्र माल खराब आहे, भाव नाही, उठाव नाही असे बहाने करून अर्धवट बाग सोडून द्यायची. हा अर्धवट शिल्लक राहिलेला माल दुसरा कोणी व्यापारी घेत नाही. मग मिळेल त्या भावाने पैसा पदरात पाडून घेण्याकरता शेतकरी माल देण्यास तयार होतो. अशीच परिस्थिती निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांचे देखील आहे.

निर्यातीसाठी ची द्राक्षे उत्पादन करण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना कमीत कमी 30 रुपये किलो सरासरी खर्च पडतो. चांगली दर्जेदार द्राक्ष निर्माण करण्यासाठी शेतकऱ्याला प्रचंड खर्च करावा लागतो. तळहाताच्या फोडा सारखी बाग जपावी लागते. नैसर्गिक आपत्ती तर शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे, त्यातून वाचली तर द्राक्ष निर्यातीसाठी तयार होतात. आणि तेव्हाच खरे झटके सहन करावे लागतात. ज्या निर्यातदार संस्थेशी किंवा कंपनीशी द्राक्ष विक्रीचा व्यवहार केलेला असेल त्या कंपनीचा कर्मचारी स्वत: बागेत येऊन माल योग्य तयार झाला असल्याची खात्री करून घेतो. द्राक्षांमध्ये कोणत्याही विषारी रसायनांचा अंश शिल्लक नाही याची खात्री होण्यासाठी द्राक्षाच्या नमुन्यांची तपासणी केली जाते त्यासाठी आठ ते दहा हजारांचा खर्च येतो हा खर्च देखील शेतकऱ्यांच्या माथी मारला जातो. व्यापाऱ्याकडून भाव नक्की झाल्यानंतर माल तोडणीच्या वेळेस कंपनीचा माणूस स्वतः हजर राहतो मजुरांची टोळी आणि या मजुरांवर देखरेख करणारा स्वतंत्र माणूस एवढी फौज असताना जाणीवपूर्वक द्राक्ष मालाचे नुकसान केले जाते. चांगला चांगला माल तोडून घ्यायचा, थोडा जरी खराब असेल तर बाजूला टाकायचा या नियमांमध्ये प्रचंड नुकसान होते. एवढे झाल्यानंतर तयार द्राक्ष माल हा युनिटमध्ये गेल्यावर वजन नक्की योग्य होईल याची हमी देता येत नाही.

तेथेही रिजेक्शन च्या नावाखाली खूप सारा माल जो आधीच निवडून घेतलेला असताना देखील खराब आहे असे सांगून बाजूला फेकला जातो. उर्वरित मालातून देखील सात टक्के कटती केली जाते. एवढे सर्व अत्याचार सहन करून देखील शेतकऱ्यांना पैसे रोख मिळत नाही. महिन्याभरानंतर पैसे मिळतील असे सांगितले जाते प्रत्यक्षात दोन दोन महिने उलटून गेले तरी पैसा मिळत नाही. या सर्व परिस्थितीत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी करायचे तरी काय हे समजू शकत नाही. अनेक बनावट व्यापारी शेतकऱ्यांचा माल घेऊन पैसे न देता फरार होऊन जातात. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रताप दिघावकर हे स्वतः काळजीने लक्ष देत आहेत. त्यांनी राबविलेली मोहीम ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक अशीच आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून अशाप्रकारे शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला तर खरोखरच पोलिस हे जनतेचे मित्र ठरू शकतील. केवळ पोलिसच नव्हे तर निफाड तालुक्यातील लासलगाव आणि पिंपळगाव या दोन्ही बाजार समिती आणि सहकार खाते यांनी देखील लक्ष देणे गरजेचे आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांनी स्वतः देखील एकजूटीने जागृत राहून प्रतिकार करणे गरजेचे आहे यात शंका नाही.