भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी

भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील विविध शाखांमधे उपलब्ध गुंतवणूक संधींची विस्तृत रूपरेषाच अहवालात दर्शवली आहे

भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्रातल्या विविध शाखांमधे उपलब्ध असलेल्या गुंतवणूक संधींची रुपरेषा दर्शवणारा अहवाल आज नीती आयोगाने प्रसिद्ध केला. रूग्णालये, वैद्यकीय उपकरणे आणि सामग्री, आरोग्य विमा, टेलिमेडिसिन, गृह आरोग्य सेवा आणि वैद्यकीय मूल्य असलेल्या प्रवासाचा पर्यायाने वैद्यकीय पर्यटनाचा या अहवालात समावेश आहे.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि अतिरिक्त सचिव डॉ. राकेश सरवाल यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला.

भारताच्या आरोग्य सेवा उद्योगाच्या वार्षिक वाढीच्या दरात 2016 पासून  सुमारे 22% वाढ होत आहे. हाच दर कायम राहिला तर 2022 मध्ये हा उद्योग 372 अब्ज डॉलर्सपर्यंत पोचणे अपेक्षित आहे. महसूल आणि रोजगार या दोन्ही क्षेत्रांचा विचार करता आरोग्यसेवा ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक बनली आहे.

“लोकसंख्येत वयस्कांचे वाढते प्रमाण, वाढता मध्यमवर्ग, अयोग्य जीवनशैलीमुळे रोगांचे प्रमाण वाढणे, सार्वजनिक-खाजगी भागीदारीवर वाढीव भर तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वेगवान अवलंब, यासह अनेक बाबी भारतीय आरोग्य सेवा क्षेत्राच्या विकासाला कारणीभूत ठरत आहेत.  कोविड -19 महामारीने देशापुढे केवळ आव्हानेच उभी केली नाहीत तर भारताला विकसित होण्याच्या दृष्टीने अनेक संधीदेखील उपलब्ध केल्या आहेत. या सर्व घटकांत्या एकत्रित परिणांमामुळे भारताचा आरोग्यसेवा उद्योग गुंतवणूकीसाठी अतिशय अनुरुप ठरतो आहे, असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी अग्रलेखात लिहिले आहे.

अहवालाच्या पहिल्या भागात, भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्राचा आढावा घेतला आहे,  रोजगार निर्मितीची शक्यता, प्रचलित व्यवसाय आणि गुंतवणूकीचे वातावरण तसेच अतिरीक्त धोरणात्मक पैस यांचा यात समावेश आहे.  दुसर्‍या भागात या क्षेत्राच्या वाढीच्या महत्त्वाच्या घटकांवर प्रकाश टाकला आहे आणि तिसऱ्या भागात, सात महत्त्वाच्या विभागांमध्ये गुंतवणुकीच्या संधींचा तसेच त्यासाठीच्या धोरणांचा उहापोह केला आहे. या सात क्षेत्रांमधे रुग्णालये आणि पायाभूत सुविधा, आरोग्य विमा, औषधशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय पर्यटन, गृह आरोग्य सेवा तसेच टेलिमेडिसिन आणि तंत्रज्ञानाशी संबंधित इतर आरोग्य सेवांचा अंतर्भाव आहे.

रुग्णालय क्षेत्रात, खासगी क्षेत्राचा विस्तार दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतल्या नागरी भागांपर्यंत वाढवणे, अर्थात हा विस्तार महानगरीय शहरांच्या पलीकडे घेऊन जाणे, त्यासाठी आकर्षक गुंतवणूकीची संधी उपलब्ध करुन देणे.  औषधनिर्माण क्षेत्राचा विचार करता सरकारच्या महत्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत स्थानिक उद्योगांना उत्पादन निर्मीतीसाठी प्रोत्साहन देणे, यामुळे देशांतर्गत उत्पादनांना चालना मिळेल.

वैद्यकीय उपकरणे आणि सामग्री क्षेत्रात, निदान आणि पॅथॉलॉजी केन्द्रांचा विस्तार तसेच छोट्या निदान केन्द्रांमधे वाढीची प्रचंड क्षमता आहे.  याव्यतिरिक्त, वैद्यकीय मूल्य पर्यटन, विशेषत: वेलनेस अर्थात निरामय पर्यटन, यांमधे मोठी शक्यता आणि क्षमता आहे. पारंपरिक वैकल्पिक औषध प्रणालींमध्ये भारताची क्षमता आहे. तंत्रज्ञानाच्या  कृत्रिम बुद्धिमत्ता, (एआय), वेअरेबल्स आणि इतर मोबाइल तंत्रज्ञानासारख्या अनेक क्षेत्रात  देखील गुंतवणूकीसाठी असंख्य संधी खुल्या आहेत.

पुढील लिंकच्या सहाय्याने संपूर्ण अहवाल पाहता येईल:

https://niti.gov.in/sites/default/files/2021-03/InvestmentOpportunities_HealthcareSector_0.pdf