केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांशी तसेच प्रधान सचिवांशी/ अतिरिक्त मुख्य सचिवांशी संवाद साधला. उद्या म्हणजे 8 जानेवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी ‘कोविड लसीकरण रंगीत तालमीच्या’ तयारीचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी व्यक्तिशः नेतृत्वाची धुरा स्वीकारून त्यात बारकाईने लक्ष घालावे अशी विनंती हर्षवर्धन यांनी यावेळी केली. कोविड-19 लसीकरणाची दुसरी देशव्यापी रंगीत तालीम उद्या 33 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या 736 जिल्ह्यांत प्रत्येकी -तीन लसीकरण केंद्रांवर होणार आहे.
प्रत्यक्ष लस देण्याच्या कार्यक्रमाचे प्रारूप, यंत्रणेला अनुभवता यावे, हा या रंगीत तालमीचा उद्देश आहे. यादरम्यान जिल्हाधिकारी/ जिल्हा दंडाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नियोजनानुसार लसीकरण कार्यक्रमाची तालीम होणार असून, यात लाभार्थ्यांची नोंदणी, सूक्ष्म नियोजन आणि नियोजित केंद्रावर लसीकरण- यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे या बैठकीला उपस्थित होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त देखरेख गटाची पहिली बैठक गेल्यावर्षी 8 जानेवारीला झाली होती. तिचे स्मरण करून देत, डॉ.हर्षवर्धन यांनी, देशाच्या कोरोनाविरोधातील यशस्वी लढाईला एक वर्ष पूर्ण झाल्याचे सांगितले. प्रत्यक्ष क्षेत्रात ठामपणे उभे राहून कोरोनाशी लढणाऱ्या आघाडीच्या योध्द्यांच्या अथक प्रयत्नांचे पुन्हा एकदा कौतुक करत डॉ हर्ष वर्धन यांनी यावेळी त्या सर्वांच्या पाठीशी सारा देश उभा असल्याचे सांगितले.
वैज्ञानिकांच्या समुदायाने केलेल्या अविरत परिश्रमांमुळेच देशाला दोन लसी मिळाल्या असून, नुकतीच त्या लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यताही मिळाली आहे. अशा शब्दात हर्षवर्धन यांनी वैज्ञानिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
आरोग्यमंत्र्यांनी यावेळी को-विन या अद्वितीय अशा डिजिटल मंचाच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली. या मंचाद्वारे, लसींच्या साठ्यांबद्दल व त्यांच्या साठवणुकीच्या तापमानाबद्दल, त्या-त्या क्षणाच्या स्थितीची (रिअलटाइम) माहिती मिळू शकणार आहे. तसेच कोविड-19 लसीच्या लाभार्थ्यांना व्यक्तिशः हेरणेही या मंचामुळे शक्य होणार आहे. पूर्वनोंदीत लाभार्थ्यांना लसीकरणाची वेळ नेमून देणे, त्यांची पडताळणी आणि प्रत्येकाचा लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे डिजिटल प्रमाणपत्र देणे- ही कामे करण्यात या मंचामुळे सर्व पातळ्यांवरील कार्यक्रम व्यवस्थापकांना मदत होणार आहे. या मंचावर 78 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांची यापूर्वीच नोंदणी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
उद्याच्या या देशव्यापी रंगीत तालमीत सर्व आरोग्यमंत्र्यांनी व्यक्तिशः लक्ष घालून या कार्यक्रमाचे त्या-त्या ठिकाणचे नेतृत्व सांभाळावे असे आवाहन डॉ.हर्षवर्धन यांनी यावेळी केले. तसेच कोविड लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता याविषयी चुकीची माहिती / अफवा पसरविणाऱ्या शक्तींविरोधात दक्ष राहण्याची विनंतीही त्यांनी आरोग्यमंत्र्यांना केली. लसीच्या दुष्परिणामांबाबत समाजमाध्यमांवर पसरणाऱ्या अफवांमुळे जनमानसात शंकेचे वातावरण तयार होत असल्याचे सांगून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या अफवा निराधार असल्याचा पुनरुच्चार केला. “या समाजकंटकामुळे लसीकरणाचा सारा प्रयत्न ढासळून जाऊन देश अनेक वर्षे मागे ढकलला जाण्याची शक्यता आहे” असे मत त्यांनी व्यक्त केले.